fir against masjid trustee of jamkhed | Sarkarnama

जामखेडमध्य़े नमाज पठणाला परदेशी नागरिक; पोलिस प्रशासन हादरले

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

कोरोनाच्य़ा पार्श्वभुमीवर परदेशी नागरिकांपासून फार सावधानता बाळगली जात असताना जामखेडच्या मशिदीत संचारबंदीचे उल्लंघन करून नमाजपठण कसे झाले, याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.

जामखेड (नगर) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभर संचारबंदी असताना, येथील काझी गल्लीतील मशिदीत नमाजपठण केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. नमाजपठणासाठी जमलेल्या 14 मधील 9 जण परदेशातून आलेले असल्याने प्रशासन हादरले आहे.

याबाबत कॉन्स्टेबल संदीप आजबे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, काझी गल्लीतील मशिदीत नमाज पठनासाठी 14 जण जमले होते. शहरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, काल (बुधवार) रात्री साडेआठच्या सुमारास 14 जण नमाज पठन करताना आढळून आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी मशिदीच्या तीन विश्‍वस्तांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
नमाज पठनासाठी उपस्थित 14 जणांमध्ये टांझानिया, इराण आदी ठिकाणच्या काही जणांचा समावेश आहे. तसेच तमिळनाडू व मुंबई येथील प्रत्येकी एकाचा समावेश होता. या सर्वांना ताब्यात घेऊन नगरला जिल्हा रुग्णालयात हलविल्याचे समजते.

सध्या धार्मिकस्थळे उघडे ठेवण्यास बंदी आहे. असे असताना मशिदीमध्ये नमाजपण करणे, तसेच विविध ठिकाणचे लोक एकत्र आल्याने जामखेडमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. जामखेड शहरात रस्त्यावर कुणीही येऊ नये, असे प्रशासनाने आवाहन केले असताना काही लोक रस्त्यावर येतात, याबाबत पोलिसांकडून काहींना प्रसादही खावा लागतो. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडू नये. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून होत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख