नंदुरबारमध्ये भाजपच्या डॉ. हीना गावित विरूध्द कॉंग्रेसचे के. सी. पाडवींमध्येच रंगणार लढत

नंदुरबार लोकसभा निवडणुकीत गेल्यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, नऊ वेळा खासदार असलेल्या माणिकराव गावित यांचा पराभव करीत 'जायंट किलर' ठरलेल्या व भाजपच्या विजयाचा इतिहास रचणाऱ्या विद्यमान खासदार डॉ. हिना गावित याच यंदाही भाजपच्या उमेदवार असणार आहेत. कॉंग्रेसने त्यांच्याविरोधात धडगावचे आमदार डॉ. के. सी. पाडवी यांना उमेदवारी देत जोरदार लढतीची तयारी केली आहे.
नंदुरबारमध्ये भाजपच्या डॉ. हीना गावित विरूध्द कॉंग्रेसचे के. सी. पाडवींमध्येच रंगणार लढत

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा निवडणुकीत गेल्यावेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, नऊ वेळा खासदार असलेल्या माणिकराव गावित यांचा पराभव करीत 'जायंट किलर' ठरलेल्या व भाजपच्या विजयाचा इतिहास रचणाऱ्या विद्यमान खासदार डॉ. हिना गावित याच यंदाही भाजपच्या उमेदवार असणार आहेत. कॉंग्रेसने त्यांच्याविरोधात धडगावचे आमदार डॉ. के. सी. पाडवी यांना उमेदवारी देत जोरदार लढतीची तयारी केली आहे.

गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात रखडलेली अनेक कामे मार्गी लागली असून विकासाचा रथ हलता ठेवत त्याला अधिक गती देण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे. दुसरीकडे पराभवातून सावरलेली कॉंग्रेसने एकदिलाने टक्कर देण्यास सज्ज झाली आहे. त्यामुळे भाजपने मांडलेली विकासगाथा आणि कॉंग्रेसने त्याला खोडण्याचा प्रयत्न करीत दिलेले आव्हान यामुळे सरळ होणारी ही लढत अधिक रंगतदार ठरणार आहे.

लोकसभेच्या गेल्या निवडणुकीत डॉ. गावित यांनी माणिकराव गावित यांचा एक लाखांवर मताने पराभव करीत इतिहास रचला होता. स्वातंत्र्यानंतर कधीही भाजपला न मिळालेल्या या कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला हादरा देत डॉ. हिना गावित यांनी येथे भाजपचे कमळ फुलविले. शिवाय संसदेतील उच्चविद्याविभूषित, सर्वात तरूण खासदारही त्या ठरल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुडबुकमध्ये असलेल्या डॉ. गावित यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघातील मूलभूत प्रश्‍न सोडविण्यास टप्प्याटप्प्याने सुरवात केली, त्याचे दृष्य परिणाम दिसत आहेत.

पायाभूत सुविधा असतील तर शासकीय योजना तिथपर्यंत नेता येतील यानुसार प्रथम गावपाड्यांपर्यंत न पोचलेला विकास, मूलभूत सुविधा नेण्याचा प्रयत्न डॉ. गावित यांनी केला. सातपुड्यातील विजेपासून वंचित राहिलेल्या गावे आणि आठशेवर पाड्यांवर वीज नेण्यासाठी त्यांनी नियोजनबध्द प्रयत्न केले. संपर्काअभावी राहिलेल्या गावांना रस्त्यांनी जोडले. दुर्गम भागातील कुपोषण सोडविण्यासाठी आरोग्य सेवा विस्तारली. 'बोट'रुग्णालय सुरू केले. दूरसंचारच्या सत्तर टॉवरची उभारणी केली. बचतगटाद्वारे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

आरोग्याच्या महागड्या सुविधांसाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून त्या जिल्ह्याच्या पदरात पाडून घेतल्या. शिक्षणाच्या दर्जेदार सुविधांसाठी काम करून त्याही मंजूर करवून घेतल्या. खासदारकीची पहिलीच टर्म असल्याने पाच वर्षांत झालेली ही खासदार झाल्यानंतर झालेली एवढी विकासकामे गेल्या सत्तर वर्षांच्या तुलनेत बरीच पुढे आहेत असे त्यांचे समथर्क सांगतात. त्यामुळे भाजपकडून त्यांनाच उमेदवारी मिळणार असा विश्‍वास मतदारसंघात आहे. दरम्यान एक-दोन दिवसात त्याची पक्षातर्फे अधिकृत घोषणा होईल.

स्वच्छ प्रतिमा, बहुमताने नाव
कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. के. सी. पाडवी हे सतत चार वेळा धडगाव या आदिवासी भागाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करीत आहेत. मतदारसंघाच्या भौगोलिक रचनेनुसार पहाडपट्ट्यात त्यांच्या शब्दाला विशेष मान आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. शिवाय पक्षाच्या धोरणानुसार तरूण आणि स्वच्छ प्रतिमेचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कॉंग्रेसच्या माणिकराव गावितानंतर कोण? असा प्रश्‍न आला तेव्हा शर्यतीत असलेल्या तीन नावातून त्यांच्या नावाला कॉंग्रेसच्या वरिष्ठांकडून एकमताने पसंती देण्यात आली.

यंदा प्रथमच कॉंग्रेसमध्ये वीस-पंचवीस वर्षापूर्वी असणारा एकजिनसीपणा दिसून येत आहे. शिवाय डॉ. पाडवी यांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे एकमताने निश्‍चित झालेले त्यांचे नाव. धडगाव, अक्कलकुवा, तळोदा आणि शहादा या परिसरात त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे. अधिकाऱयांच्या कामात कधीही ढवळाढवळन करणारी व्यक्ति म्हणूनही त्यांचे नाव घेतले जाते. या साऱ्या बाबींवरून त्यांना कॉंग्रेसने पसंती दिली आहे. त्यामुळे कॉंग्रेसही जोरदार लढत देणार असे चित्र सध्यातरी दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com