दक्षिण - मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : लढत शिवसेनेसाठी सोपी नाही

'मोदी लाट' आणि 'युती' अशा दुहेरी लाभामुळे दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघावर 2014 मध्ये शिवसेनेने भगवा फडकवत कॉंग्रेसला "हात' दाखवला. या वेळी पुन्हा युती झाली असली, मतांचा खड्डा पडणार नाही, याची काळजी युतीला, त्याहीपेक्षा शिवसेनेला अधिक घ्यावी लागणार आहे. कॉंग्रेसशी होणारी थेट लढत शिवसेनेसाठी सोपी आणि सरळ राहिलेली नाही, असेच सध्याचे चित्र आहे.
Rahul Shewale- Eknath Gaikwad - Bhalchandra Mungekar
Rahul Shewale- Eknath Gaikwad - Bhalchandra Mungekar

मुंबई : मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर 2009 च्या निवडणुकीत एकनाथ गायकवाड यांनी कॉंग्रेसचा झेंडा फडकवला. त्या वेळी त्यांना अडीच लाखांहून अधिक मते मिळाली होती; मात्र 2014 च्या निवडणुकीत गायकवाड यांची मते केवळ 15 हजारांनी कमी झाली होती. शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी तीन लाखांहून अधिक मते घेतली. मोदी लाटेतही कॉंग्रेसच्या पारंपरिक मतांना या मतदारसंघात फारसा धक्का लागला नव्हता, असेच यावरून स्पष्ट होते. नव मतदार उत्साहाने मतदानासाठी घराबाहेर पडल्याने शिवसेनेला येथे विजय मिळवता आला. हेच चित्र आगामी निवडणुकीत कायम राहावे यासाठी शिवसेना प्रयत्न करणार हे निश्‍चित असले, तरी पूर्वीची मोदी लाट ओसरल्याने शेवाळेंसाठी ही लढत सोपी राहिलेली नसल्याचे दिसते.

रिपाइंचे नेते व सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही या मतदारसंघावर दावा केला आहे. भाजपने याबाबत "मातोश्री'च्या दिशेने बोट दाखवल्याने आठवलेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. "एनडीए'चे सरकार आल्यास कॅबिनेट मंत्रिपद आणि विधानसभेसाठी अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याच्या दृष्टीनेच आठवलेंचे प्रयत्न असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात आठवले रिंगणात नसतील हे निश्‍चित.

मुंबई महापालिकेत तीन वेळा राहिलेल्या शेवाळेंचा खासदार झाल्यानंतर जनसंपर्क कमी झाल्याची चर्चा मतदारसंघात आहे. खासदारकीच्या केवळ पहिल्या वर्षी त्यांनी मतदारसंघात चांगले लक्ष दिले होते. त्यानंतर सहा महिन्यांपासून ते पुन्हा दिसू लागले. त्यांनी स्वतःची वाट बिकट करून ठेवली, अशी चर्चा आहे. कॉंग्रेसतर्फे पुन्हा एकनाथ गायकवाड रिंगणात उतरण्याची शक्‍यता वर्तवली जात असतानाच त्यांची कन्या वर्षा गायकवाड यांचेही नाव चर्चेत आहे. तसेच, यापूर्वी राज्यसभेवर गेलेले भालचंद्र मुणगेकर यांनीही उमदेवारीसाठी दिल्लीपर्यंत "लॉबिंग' केले आहे.

पक्षनिहाय संभाव्य उमेदवार
शिवसेना : राहुल शेवाळे
कॉंग्रेस : एकनाथ गायकवाड, वर्षा गायकवाड, भालचंद्र मुणगेकर

मतदारांमधील नाराजीची कारणे...
सायन, चेंबूर परिसरातील रिफायनरीमुळे वायू प्रदूषण
खारजमीन, बीपीटी, रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण
जुन्या व मोडकळीस आलेल्या चाळींमधील रहिवांशाचा प्रश्‍न
देवनार क्षेपणभूमीचे शास्त्रोक्त पुनर्भरण झालेले नाही
धारावीचा पुनर्विकास रखडलेलाच

2014 मधील मतविभाजन...
राहुल शेवाळे (शिवसेना) ः 3,81,008
एकनाथ गायकवाड (कॉंग्रेस) ः 2,42, 828
आदित्य शिरोडकर (मनसे) ः 73,096

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com