यवतमाळ मतदारसंघात काँग्रेस-भाजपमध्येच थेट लढत; सेना बंडखोर व प्रहारच्या उमेदवारांमुळे मतविभाजनाचा धोका 

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष यवतमाळ विधानसभा मतदारसंघावर लागलेले आहे. या मतदाररसंघाचे वर्चस्व संपूर्ण जिल्ह्यावर असते. त्यामुळे येथून कोण आमदार होणार याबाबत जनतेला फार उत्सुकता असते. शिवाय, भाजप नेते व जिल्ह्याचे पालकमंत्रीच या मतदारसंघातून निवडणूक लढवीत असल्याने व त्यांच्या विरोधात काँग्रेसने जनसामान्यांचे नेते म्हणून ख्याती असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब उर्फ अनिल मांगुळकर यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे.
Madan Yerawar - Balasaheb Mangulkar
Madan Yerawar - Balasaheb Mangulkar

यवतमाळ : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष यवतमाळ विधानसभा मतदारसंघावर लागलेले आहे. या मतदाररसंघाचे वर्चस्व संपूर्ण जिल्ह्यावर असते. त्यामुळे येथून कोण आमदार होणार याबाबत जनतेला फार उत्सुकता असते. शिवाय, भाजप नेते व जिल्ह्याचे पालकमंत्रीच या मतदारसंघातून निवडणूक लढवीत असल्याने व त्यांच्या विरोधात काँग्रेसने जनसामान्यांचे नेते म्हणून ख्याती असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब उर्फ अनिल मांगुळकर यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. सेना बंडखोर व प्रहारच्या उमेदवारांमुळे मतविभाजनाचा धोका वाढला असला तरी खरी लढत ही भाजप व काँग्रेसमध्येच असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

यावेळी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचे बाळासाहेब उर्फ अनिल मांगुळकर, भाजपचे मदन येरावार, बहुजन समाज पक्षाचे संदीप देवकते, सरदार वल्लभभाई पटेल पार्टीचे अब्दुल अजीज अब्दुल सत्तार दुंगे, विदर्भ राज्य आघाडीचे अ‍ॅड. अमोल बोरखडे, बळीराजा पार्टीचे श्याम बजाज, प्रहार जनशक्ती पक्षाचे बिपिन चौधरी, वंचित बहुजन आघाडीचे योगेश पारवेकर, बहुजन मुक्ती पार्टीच्या सारिका भगत व अपक्ष म्हणून अशोक काळमोरे, जावेद शेख, मनोज गेडाम, संतोष ढवळे आदींनी उमेदवारी दाखल केली आहे. 

यवतमाळ विधानसभा मतदारसंघाच्या निर्मितीपासून तीनपेक्षा जास्त वेळा आमदार म्हणून राहण्याची संधी एकतर विदर्भवीर भाऊ जांबुवंतराव धोटे व विद्यमान आमदार मदन येरावार यांनाच मिळाली आहे. तत्कालीन आमदार राजाभाऊ ठाकरे खासदार झाल्यानंतर 1996मध्ये झालेली पोटनिवडणूक विचारात घेता मदन येरावार यांना तीनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याचा योग लाभला आहे. तर, जिल्हा परिषद सदस्य म्हणून गेली पंचवीस वर्षे जनसेवा केलेले बाळासाहेब मांगुळकर यावेळी ही निवडणूक लढवीत आहेत. काँग्रेस पक्षाने बाळासाहेब मांगुळकर यांना एकदातरी विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी जनतेची मागणी होती. यावेळी काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्याने जनसामान्यांचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. 

शहरी भागासह ग्रामीण भागातही त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांनी ग्रामीण विकासाला चालना दिल्याने अनेक गावांमध्ये कार्यकर्त्यांची फळी त्यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येते. तर, मदन येरावार यांनी शहराच्या विकासासाठी कोट्यवधींचा आणला. त्यामुळे शहरातील अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. परंतु, ती अद्याप प्रत्यक्षात न आल्याने जनतेमध्ये काहीसा रोष असल्याचे दिसून येते. अपूर्ण असलेली कामे पूर्ण करण्यासाठी सरकारमध्ये पुन्हा त्यांना संधी द्यायची की, जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितले जाते त्या बाळासाहेबांना निवडायचे, हा विचार सध्यातरी जनतेच्या मनात घोळत आहे. 

जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई असे वर्णन या लढतीचे राजकीय विश्‍लेषक करीत आहेत. या आखाड्यात दोन उमेदवारांच्या लढती विचारात घेणे क्रमप्राप्त आहे. शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख संतोष ढवळे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यांचा 2014 च्या निवडणुकीत आमदार मदन येरावार यांच्याशी रंगलेला सामना इतिहासात नोंद करून गेला आहे. अवघ्या 1227 मतांनी ढवळे यांचा पराभव झाला होता. यावेळी भाजप-सेनेची युती असताना ढवळे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केली. त्यामुळे युती असली तरी ती वरवरची दिसत आहे. प्रत्यक्षात चित्र काही वेगळेच आहे. भाजपचा एक गट अलिप्त राहून शेजारच्या मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहे. परंतु, युतीचे नेते ते स्वीकारायला तयार नाहीत. तर, प्रहार जनशक्ती पक्षाकडून बिपिन चौधरी यांनी उमेदवारी दाखल केली. तरूणांमध्ये त्यांची एक वेगळी ’क्रेझ’आहे. शिवाय, आरोग्यविषयक सेवा व जनतेच्या प्रश्‍नाला नेहमी ’प्लॅटफॉर्म’ मिळवून दिल्याने त्यांच्याविषयी युवकांमध्ये सहानुभूती दिसून येते. त्यामुळे मतविभाजनात या दोनच उमेदवारांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. 

जातीय समीकरणेही त्यांना लागू पडतात. या मतदारसंघाचा विचार केल्यास शहरी व ग्रामीण असे दोन भाग पडतात. येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह हिंदी भाषिकांचेही महत्त्व अनन्यसाधारण आहे. व्यापारी व उद्योजकांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची ठरते. त्यांचा कुणाला पाठिंबा मिळतो, यावर बरेचकाही अवलंबून असते. जातीय समीकरणांचा विचार करताना हा मतदारसंघ मराठा-कुणबीबहुल आहे. मुस्लिम व बौद्ध यांचीही मते निर्णायक आहेत. तेली समाजही मोठ्या संख्येत असून त्याखालोखाल माळी, धनगर व बहुजन समाजाची संख्या आहे. मात्र, या मतदारसंघाचे नेतृत्व नेहमीच अल्पसंख्याक उमेदवारानेच केले आहे. यावेळी मोदी लाटेचा ’अंडरकरंट’ दिसून येत नसला तरी विकासाला मते मागितले जात आहे. परंतु, या मतदारसंघात भाऊ जांबुवंतराव धोटे सोडले तर कोणताच आमदार सलग कधीही रिपीट न झाल्याचा इतिहास आहे. यावेळी या इतिहासाची पुनरावृत्ती होते की नवचेतनेचा ध्यास घेत परिवर्तन होते, हे 24 ऑक्टोबरलाच कळणार आहे. तोपर्यंत जनादेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वर्षे           आमदार         पक्ष
1962 : जाम्बुवंतराव धोटे (अपक्ष)
1967 : जाम्बुवंतराव धोटे (अपक्ष)
1972 : के. एन. रामचंद्र घारफळकर (फॉरवर्ड ब्लॉक)
1978 : जाम्बुवंतराव धोटे (अपक्ष)
1980 : आबासाहेब पारवेकर (काँग्रेस आय)
1985 : सदाशिवराव ठाकरे (काँग्रेस)
1990 : अण्णासाहेब पारवेकर (जनता दल)
1995 : राजाभाऊ ठाकरे (भाजप)
1996 : मदन येरावार (भाजप) पोटनिवडणूक
1999 : कीर्ती गांधी (काँग्रेस)
2004 : मदन येरावार (भाजप)
2009 : नीलेश पारवेकर (काँग्रेस)
2013 : नंदिनी पारवेकर (काँग्रेस) पोटनिवडणूक
2014 : मदन येरावार (भाजप)

मतदारसंघात 1995 पासून भाजपचा उदय
यवतमाळ विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा उदय 1995 च्या निवडणुकीत झाला. त्यावेळी भाजपचे राजाभाऊ ठाकरे दुग्धविकास व पशुसंवर्धन विभागाचे मंत्री झाले होते. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि राजाभाऊ ठाकरे खासदार झाले. त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे मदन येरावार आमदार झाले. 2004 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा येरावार आमदार झाले. 2014 पुन्हा मोदी लाटेत मदन येरावार यांनाच संधी मिळाली. पूर्वी यवतमाळ विधानसभेत बाभूळगाव तालुका समाविष्ठ होता. तर, 2009मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली व स्वतंत्रपणे यवतमाळ विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. तेव्हापासून या मतदारसंघाने पुन्हा कूस बदलली असून येथील राजकारण कधी काँग्रेस तर कधी भाजपभोवती फिरताना दिसत आहे. 

पुन्हा मांगुळकर-येरावार आमने-सामने
1996मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत तत्कालिन जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती बाळासाहेब मांगुळकर व नगरपालिकेचे तत्कालिन बांधकाम समिती सभापती मदन येरावार यांच्यातच घमासान झाले होते. तेव्हा यवतमाळ मतदारसंघात बाभूळगाव तालुका अंतभूत होता. काँग्रेसचे बाभूळगाव तालुक्यातील नेते हिम्मत पांडे यांनी बंडखोरी केल्याने काँग्रेसचे मतविभाजन झाले व मदन येरावार आमदार झाले होते. त्यानंतर पुन्हा 18 वर्षांनंतर पुन्हा मांगुळकर व येरावार आमने-सामने आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com