fight against corona demand of audio books increases in lockdown | Sarkarnama

लॉकडाऊनमध्ये वाढतेय 'ऑडिओ बुक्स'ची क्रेझ

केतन पळसकर
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

दोन वर्षापूर्वी साहित्य जगतामध्ये झालेल्या ऑडिओ बुक्सच्या आगमनाने पुस्तके बोलती व्हायला सुरुवात झाली आहे. बघता-बघता साहित्यातील या नव्या माध्यमाने बाजारात आपला जम बसवायला सुरुवात केली. लॉकडाऊनच्या काळामध्ये जगभरातून ऑडिओ बुक्सची मागणी वाढली आहे. विश्वास नांगरे पाटलांचे 'मन में है विश्वास' आणि शरद पवारांचे 'लोक माझे सांगाती' या महिन्यात रिलिज झाले आहे. याला साहित्यप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

नागपूर : दोन वर्षापूर्वी साहित्य जगतामध्ये झालेल्या ऑडिओ बुक्सच्या आगमनाने पुस्तके बोलती व्हायला सुरुवात झाली आहे. बघता-बघता साहित्यातील या नव्या माध्यमाने बाजारात आपला जम बसवायला सुरुवात केली. लॉकडाऊनच्या काळामध्ये जगभरातून ऑडिओ बुक्सची मागणी वाढली आहे. विश्वास नांगरे पाटलांचे 'मन में है विश्वास' आणि शरद पवारांचे 'लोक माझे सांगाती' या महिन्यात रिलिज झाले आहे. याला साहित्यप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

विशेषतः, साहित्याला तंत्रज्ञानाची जोड असल्यामुळे या प्रकाराकडे युवक, नवा साहित्य वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षित होतो आहे. दिवसाला दोन ते अडीच हजार साहित्यप्रेमी या प्रकारातील अप्लिकेशनचे सभासदत्व स्वीकारत आहेत. ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून हिंदी, इंग्रजीसह मराठी भाषेमधील साहित्याचा ठेवा घरोघरी पोहोचतो आहे. नव्वद हजारांपेक्षा जास्त पुस्तके मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून साहित्यप्रेमींना ऐकायला मिळत आहेत. यामध्ये, प्रामुख्याने १८ ते ४५ या वयोगटांतील साहित्यप्रेमींचा समावेश मोठ्या संख्येने आहे.

गो. नी. दांडेकर, पु. ल. देशपांडे, जयंत दळवी, रत्नाकर मतकरी अशा सर्व थोर साहित्यिकांचे संपूर्ण साहित्य यावर ऐकायला मिळेत आहे. बाल साहित्य, प्रवास वर्णन, नावाजलेल्या कादंबऱ्या, रहस्यकथा, चरित्र, कविता अशा विविध साहित्य प्रकारांमध्ये हे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. विविध स्टुडिओमध्ये हजारो पुस्तके ध्वनीबद्ध होत आहेत, तर पुढच्या पाच वर्षांमध्ये हा नव्या दमातील साहित्य प्रकार बाजारपेठ कवेत घेणार असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्यामध्ये, जागतिक स्तरावरील व्यावसायिकांसह छोट्या स्वरूपाचे उद्योजकदेखील या साहित्य प्रकाराच्या निर्मितीला हातभार लावीत आहेत.

कामात विरंगुळा
कोरोनामुळे जगभर लोक घरी बसून काम करीत आहे. कामात विरंगुळा म्हणून ऑडिओ बुक्स पुस्तकप्रेमींसाठी जास्त उपयुक्त पडत आहे. वाचक स्वतः एकमेकांना या विषयी माहिती देत असून ऑडिओ बुक्स डाऊनलोड करा असेही सुचवत आहेत.
-प्रसाद मिरासदार,
प्रकाशक, मराठी ऑडिओ बुक्स.

'लोक माझे सांगाती' ऑडिओरुपात
ऑडिओ बुक्सची निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून '२१ दिवसात २१ पुस्तके कोणती ऐकाल' या विषयी यादी तयार करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात हे अप्रतिम नवे साहित्य साहित्यप्रेमीसाठी कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, अप्लिकेशनद्वारे ३० दिवसांसाठी मोफत सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटलांचे 'मन में है विश्वास' आणि शरद पवारांचे 'लोक माझे सांगाती' या महिन्यात रिलिज झाले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख