प्रणवदांच्या एका शब्दाने तरुणाचा "पौधा चोर' ते "ट्री मॅन'पर्यंतचा प्रवास

प्रणव मुखर्जींना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच या संकटातून ते बाहेर पडावेत, अशी प्रार्थना देवाकडे करायचो. बोलण्याची खूप इच्छा होती; मात्र माझे आयुष्य हिरवेगार करणाऱ्या दादांना अखेरपर्यंत भेटता आले नाही. याचे शल्य आयुष्यभर कायम राहील.- विष्णू लांबा, 'ट्री मॅन'
Pranab Mukherjee - Vishnu Lamba
Pranab Mukherjee - Vishnu Lamba

मुंबई  : जेथे जाईल तेथून रोपटे चोरायची सवय. नंतर त्यांची कुठेतरी लागवड करायची. त्यामुळे अख्खे गाव या तरुणाला 'पौधा चोर' म्हणून चिडवायचे. मात्र, प्रणव मुखर्जी यांच्या 'ट्री मॅन' या एका शब्दाने या युवकाचे आयुष्य बदलले. नंतर कोणत्याही सरकारी मदतीशिवाय त्याने देशात तब्बल ५० लाख झाडांची लागवड, संवर्धन केले. राजस्थानच्या विष्णू लांबा यांची ही कहाणी. 'पौधा चोर ते ट्री मॅन' असा प्रवास केवळ प्रणवदा यांच्या प्रेरणेने होऊ शकला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

राजस्थानच्या विष्णू लांबा यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्या ५२ लोकांचे वारसदार शोधून काढले आहेत. दोन वर्षांच्या या शोधमोहिमेनंतर २०१२ मध्ये काही निवडक वारसदारांना प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनात आमंत्रित केले होते. या हुतात्म्यांना शोधून काढणारा मुलगा कोण, असे कुतूहलाने त्यांनी विचारले. महाराष्ट्रातील शहीद विष्णू पिंगळे यांचे वारसदार राजेंद्र पिंगळे यांनी प्रणव मुखर्जी यांना विष्णू लांबा यांची ओळख करून दिली. या तरुणाला 'पौधा चोर' असे म्हटले जाते, असे पिंगळे यांनी सांगताच प्रणव मुखर्जी यांनी राग व्यक्त करत हा मुलगा 'पौधा चोर' नाही "ट्री मॅन' आहे, असे उद्‌गार काढले. लांबा यांच्या पाठीवर हात फिरवत पर्यावरणाच्या कामाला वाहून दे. हे काम सोडू नकोस, असा आशीर्वाद त्यांनी दिला. प्रणव मुखर्जी यांच्या या शब्दाने आयुष्य बदलले आणि वृक्ष लागवडीला आयुष्याचे ध्येय बनवले. मला देशात या मोहिमेदरम्यान आजपर्यंत कधीच त्रास झाला नाही, असे विष्णू लांबा यांनीसांगितले.

शेवटची चोरी राष्ट्रपती भवनात
राष्ट्रपती भवनात सवयीप्रमाणे मी भवनाच्या कुंडीतील एक कॅक्‍टसचे फूल तोडले आणि खिशात ठेवले. मात्र, ही माझी शेवटची चोरी होती. त्यानंतर आयुष्यात मी कधी झाड चोरले नाही. ही प्रणवदांच्या शब्दाची ताकत होती, असे लांबा सांगतात. २०१२ नंतर प्रणवदांना भेटण्याची संधी मिळाली नाही. एकदा लोकसभा अध्यक्षांसोबत त्यांच्या घरी गेलो होतो; मात्र दादा घरी नव्हते.

प्रणव मुखर्जींना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच या संकटातून ते बाहेर पडावेत, अशी प्रार्थना देवाकडे करायचो. बोलण्याची खूप इच्छा होती; मात्र माझे आयुष्य हिरवेगार करणाऱ्या दादांना अखेरपर्यंत भेटता आले नाही. याचे शल्य आयुष्यभर कायम राहील.- विष्णू लांबा, 'ट्री मॅन'

देशभरात चळवळ
विष्णू लांबा यांनी आतापर्यंत देशभरात २६ लाख झाडांची लागवड केली आहे; तर १३ लाख वृक्ष तोडण्यापासून वाचवले आहेत. १३ लाख झाडे मोफत वाटली आहेत. राजस्थान ते मध्य प्रदेश, महाराष्ट्रापर्यंत त्यांनी आपली चळवळ पुढे नेली आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com