मूर्तीदान, सीडबॉल मोदक, वैद्यकीय महाप्रसाद; कोरोनाच्या छायेतील मुंबईचा गणेशोत्सव

कोरोनाच्या छायेतील गणेशोत्सव निर्विघ्नपणे व्हावा तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून यावेळी मुंबईतील अनेक लोकप्रतिनिधींनी महाप्रसादात सॅनिटायझर-अर्सेनिक अल्बम गोळ्या, मूर्तीदान, घरपोच मूर्ती देणे तसेच निःशुल्क विसर्जन व्यवस्था, इमारतींमध्ये कृत्रिम तलाव अशी सोय केली आहे
Ganesh Festival in Mumbai Changed Pattern due to corona
Ganesh Festival in Mumbai Changed Pattern due to corona

मुंबई : कोरोनाच्या छायेतील गणेशोत्सव निर्विघ्नपणे व्हावा तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून यावेळी मुंबईतील अनेक लोकप्रतिनिधींनी महाप्रसादात सॅनिटायझर-अर्सेनिक अल्बम गोळ्या, मूर्तीदान, घरपोच मूर्ती देणे तसेच निःशुल्क विसर्जन व्यवस्था, इमारतींमध्ये कृत्रिम तलाव अशी सोय केली आहे. माहीमच्या नगरसेविका शीतल गंभीर देसाई यांनी तर बाप्पांच्या प्रसादासाठी सीडबॉल मोदक तयार केले असून त्यांचे वाटप विभागात केले जाईल.

उत्सव साजरा करणे सर्वांनाच सोयीचे जावे म्हणून घरगुती मूर्ती दोन फुटांच्याच असाव्यात असे शासनाने सुचविले आहे. त्यानुसार मागठाणे येथील नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांनी नागरिकांना तसेच छोट्या मंडळांना दोन फुटांच्या शंभर  मूर्ती निःशुल्क दिल्या. तर चांदीवली शिवसेनेतर्फे प्रयाग दिलीप लांडे यांनी सुमारे पाचशे मूर्ती निःशुल्क दिल्या असून त्या घरपोच देण्याची व्यवस्था केली आहे. 

या मूर्तींच्या विसर्जनाची जबाबदारीही शिवसेना कार्यकर्ते घेणार असून ते घरी येऊन विसर्जनासाठी या मूर्ती घेऊन जातील. दहीसरच्या शिवसेना नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनीदेखील अशीच व्यवस्था आपल्या प्रभागात केली आहे. सायनच्या नगरसेविका राजेश्री शिरवडकर यांनी श्रीफळ, फळे, हळद-कुंकू, तांदूळ, आदी पूजासाहित्याचे किट तयार करून त्यात आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या, सॅनिटायझर, मास्क या आवश्यक बाबीही समाविष्ट केल्या आहेत. ही कीट तेथे घरोघर वाटली जातील.

सीडबॉल मोदकांचा नैवैद्य
माहीमच्या भाजप नगरसेविका शीतल गंभीर देसाई यांनी पर्यावरणपूरक सीडबॉलचे मोदक तयार केले आहे. मातीच्या या मोदकात वेगवेगळ्या भेंडी, डोमॅटो, पालक आदी पालेभाज्या व फळझाडांच्या बिया घातल्या आहेत. बाप्पांच्या विसर्जनानंतर हे मोदक कोठेही कुंडीत, मैदानात, मोकळ्या जागेत, रस्त्याशेजारी, डोंगरावर टाकले तर त्यातून झाडे उगवतील अशी यामागील संकल्पना आहे. विशेष म्हणजे भूगर्भातील पाणी शोषून घेणाऱ्या परदेशी झाडांच्या या बिया नसून पर्यावरणपूरक अशा देशी झाडांच्या या बिया असल्याचेही त्यांनी सकाळ ला सांगितले. हे सीडबॉल मोदक त्यांच्यातर्फे विभागात घरोघरी तसेच मंडळांमध्ये वाटले जातीलच. पण अन्य कोणालाही हे हवे असतील तर त्यांनाही संपर्क साधण्याचे आवाहन श्रीमती देसाई यांनी केले आहे. हे मोदक सीडबॉल तयार करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू, असे आवाहनही त्यांनी समाजमाध्यमांवर केले आहे.

त्याखेरीज श्रीमती देसाई यांनी आपल्या मतदारसंघातील मोठ्या दहा निवासी संकुलांमध्ये कृत्रिम हौद ठेवले आहेत. चारशे पाचशे रहिवासी असलेल्या या इमारतींच्या आवारात दहा फूट लांब रुंद व तीन फूट खोल हौद ठेवण्यात आले आहेत. त्यात परिसरातील रहिवाशांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यावर दुसऱ्या दिवशी महापालिकेतर्फे त्या मूर्ती नेऊन खोल समुद्रात त्यांचे विसर्जन केले जाईल, असे श्रीमती देसाई यांनी सांगितले. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com