मुलांच्या भविष्यासाठी नेत्यांची प्रतिष्ठा; तटकरे, कदम, राणे तळ ठोकून

राजकारणात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची पुढील पिढी निवडणूक रिंगणात नशीब आजमावण्यासाठी उतरली आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांच्या पुढच्या पिढीतील आदित्य ठाकरेंपासून ते रोहित पवारांची नावे घ्यावी लागतील. तशीच परिस्थिती कोकणातही निर्माण झाली आहे. सुनील तटकरे, रामदास कदम आणि नारायण राणे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी निवडणुकीत दंड थोपटून आहेत.
Narayan Rane - Sunil Tatkare - Ramdas Kadam
Narayan Rane - Sunil Tatkare - Ramdas Kadam

रत्नागिरी  : राजकारणात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांची पुढील पिढी निवडणूक रिंगणात नशीब आजमावण्यासाठी उतरली आहे. राज्यातील दिग्गज नेत्यांच्या पुढच्या पिढीतील आदित्य ठाकरेंपासून ते रोहित पवारांची नावे घ्यावी लागतील. तशीच परिस्थिती कोकणातही निर्माण झाली आहे. सुनील तटकरे, रामदास कदम आणि नारायण राणे आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी निवडणुकीत दंड थोपटून आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वीपासून कोकणातील नेत्यांच्या पुढील पिढीतून रिंगणात कोण उतरणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. त्यावरून गृहकलहालाही सामोरे जावे लागले. कुटुंबांमध्ये दरी पडली होती. प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नेत्यांच्या मुलांची नावे फुटली. 

त्यात रायगडमधून राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांची मुलगी आदिती तटकरे श्रीवर्धनमधून, पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम दापोली-खेडमधून, तर सिंधुदुर्गात कणकवलीतून नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नीतेश राणे भाजपकडून रिंगणात उतरले आहेत. विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोचली असताना मुलांच्या प्रचारासाठी नेत्यांनी जबरदस्त नियोजन केले आहे. त्यामुळे कोकणातील ही निवडणूक पित्यांच्या प्रतिष्ठेची ठरणारी आहे.

कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून नीतेश राणे निवडणूक रिंगणात आहेत. येथे नारायण राणेंच्या अस्तित्वाची लढाई सुरू आहे. युती असूनही शिवसेनेने राणेंविरोधात उमेदवार दिला आहे. येथे शिवसेनेकडून सतीश सावंत रिंगणात आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे या लढतीकडे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे हे दोघेही उमेदवारांच्या प्रचारासाठी कणकवलीत येणार असल्याने सर्वाधिक चर्चेची निवडणूक म्हणून पाहिले जात आहे.

राणेंविरोधात सर्व विरोधक एकवटल्याने राणे कुटुंबासाठी प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
रत्नागिरीत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम दापोली-खेडमधून शिवसेनेकडून उभे आहेत. गेली चार वर्षे योगेश यांनी मोर्चेबांधणी केली होती. शिवसेनेचे पाच टर्म आमदार राहिलेले सूर्यकांत दळवी यांना डावलण्यात आल्याने नाराजी आहे. स्वकीयांचे आव्हान कदमांपुढे आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संजय कदम तळागाळात पोचलेले असल्यामुळे दुहेरी आव्हानाला सामोरे जावे लागत आहे. मुलासाठी रामदास कदम मतदारसंघात तळ ठोकून आहेत.

श्रीवर्धनमध्ये कॉंटे की टक्कर
तटकरे यांची कन्या आदिती विरुद्ध शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांच्यात श्रीवर्धनमधून लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीत श्रीवर्धनमधून तटकरे यांना 38 हजारांचे मताधिक्‍य मिळाले होते. त्यामुळे मुलगी आदितीसाठी तटकरे यांनी सुरक्षित मतदारसंघ शोधला. पण सेनेने कुठल्याही परिस्थितीत राजकीय तडजोड न करणारा उमेदवार दिल्यामुळे इथे कॉंटे की टक्कर होईल, असे अपेक्षित आहे. त्यामुळे सुनील तटकरेंना पुन्हा रायगडवर आपले वर्चस्व मिळवण्यासाठी ही निवडणूक जिंकावीच लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com