राजधानीत धडक, शेतकरी प्रश्‍नांसाठी विरोधक एकाच व्यासपीठावर

  राजधानीत धडक, शेतकरी प्रश्‍नांसाठी विरोधक एकाच व्यासपीठावर

नवी दिल्ली : आपल्या विविध मागण्यांसाठी राजधानीत दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी विचारसरणीच्या राजकीय नेत्यांना एकाच व्यासपीठावर येण्यास भाग पाडले. "मतभेद असले, तरी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सर्व पक्ष एक आहेत,' अशी ग्वाही कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिली. तर, स्वामिनाथन आयोग लागू न करण्याचे सर्वोच्च न्यायालयात सादर केलेले प्रमाणपत्र मोदी सरकारने मागे घ्यावे आणि पीकविमा योजना बंद करून भरपाई योजना सुरू करावी, अशी आक्रमक मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली. 

संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला दीडपट आधारभूत किमतीच्या हक्कासाठी अखिल भारतीय किसान समन्वय संघर्ष समितीच्या आवाहनानुसार देशभरातील दोनशेहून अधिक शेतकरी संघटनांनी रामलिला मैदानापासून ते संसदेपर्यंत काढलेल्या मोर्चामुळे दिल्लीकरांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांची धग जाणवून दिली. संसद मार्गावर किसान संसद भरविण्यात येऊन कर्जमाफी आणि दीडपट एमएसपीसंदर्भातील खासगी विधेयकाच्या मसुद्यावर चर्चा करण्यात आली. या वेळी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्याबरोबरच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार, माकप सरचिटणीस सीताराम येचुरी, भाकप खासदार डी. राजा, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख डॉ. फारुक अब्दुला, समाजवादी पक्षाचे प्रतिनिधी खासदार धर्मेंद्र यादव, तृणमूल कॉंग्रेसचे नेते दिनेश त्रिवेदी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, कॉंग्रेसचे नाना पटोले यांच्यासह विरोधी पक्षांचे, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी जमले होते. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हे नेते प्रथमच एका व्यासपीठावर आल्याचे दिसले. 

आम आदमी पक्षातून अवमानजनक परिस्थितीमध्ये बाहेर पडावे लागलेले योगेंद्र यादव हेदेखील पहिल्यांदाच केजरीवाल यांच्यासोबत दिसून आले. मात्र, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेचा कोणताही प्रतिनिधी व्यासपीठावर नव्हता. माकप सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी बोलताना कम्युनिस्ट विचारसरणीचा लाल रंग शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव संघर्षरत राहील, अशी ग्वाही दिली. महाभारतात 100 कौरवांपैकी ज्याप्रमाणे दुर्योधन आणि दुःशासन ही दोनच नावे लक्षात राहतात, त्याप्रमाणे भाजपमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह हीच नावे समोर येतात, अशी उपरोधिक टिप्पणी केली. तर, शरद पवार यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर विरोधकांच्या एकजुटीची ग्वाही देताना मोदी सरकारने शेतकऱ्यांना पूर्णपणे निराश केल्याची खंत बोलून दाखवली. 

शेतकऱ्यांचा एल्गार 
- वेगवेगळ्या राज्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांचा बुधवारपासूनच रामलिला मैदानावर ठिय्या. 
- शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे दिल्लीतील गजबजलेल्या के. जी. मार्ग, फिरोजशाह रोड, जनपथ, मंदिर मार्ग, पंचकुईया मार्ग, अशोक रोड, कॅनॉटप्लेस या भागांतील वाहतूक विस्कळीत झाली होती. 
- मोर्चाचा परिणाम न होता वाहतूक सुरळीत राहावी, दिल्ली पोलिसांच्या वाहतूक शाखेने एक हजार वाहतूक पोलिसांना तैनात करण्यात आले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com