गुजरात, मुंबईचा दूध, भाजीपाला रोखला

गुजरात, मुंबईचा दूध, भाजीपाला रोखला

नाशिक - शेतकरी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी आज जिल्ह्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. गावोगावी बाजारपेठा तसेच बाजार समित्या आणि दूध संकलन बंद ठेऊन शेतकऱ्यांनी बंदला चोख सुरवात केली. यामध्ये ठिकठिकाणी राज्य शासन, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमांचे दहन व अंत्ययात्रा काढण्यात आली. या बंदमुळे गुजरात, मुंबईसह देशातील विविध बाजारपेठांत जाणारा भाजीपाला निर्यात ठप्प झाली.

आज महाराष्ट्र बंदला नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळाला, शहरातही विविध दुकाने बंद होती. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सतरा बाजार समित्या व त्यांच्या उप-बाजार आवारांवरील आवक ठप्प झाली आहे. शेतकऱ्यांच्या उस्फूर्त प्रतिसादाने बंदचा मोठा परिणाम दिसून आला. सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव यांसाठी सुरु झालेल्या या आंदोलनाची सूत्रे आता नाशिकमधून हलविली जात आहेत.

त्यामुळे काल येथे झालेल्या मेळाव्यानंतर राज्यातील संपाची दिशा ठरविण्यासाठी राज्यभरातील संघटनांचे प्रतिनिधी, नेत्यांशी संपर्क साधला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन हजारांहून अधिक मोठा पोलिस बंदोबस्त आहे. राज्य राखीव दलाच्या तीन तुकड्या, दंगाविरोधी पथकही सज्ज ठेवण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक अंकुश शिंदे हे यासंदर्भात राज्याच्या गृह विभागाच्या संपर्कात आहेत.

ठिकठिकाणी अंत्ययात्रा
कळवण येथे सकाळपासूनच शेतकरी, नागरीक जमुत होते. त्यांनी नऊला येथील चौफुलीवर रास्ता रोको केला. यावेळी राज्य शासन, मुख्यमंत्री, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाशिक- कळवण रस्त्याची वाहतूक ठप्प झाली. सायगाव आणि नगरसुल (ता. येवला) येथे काल रात्रीच शहरात फलक लिहून संपाला पाठींबा दिला होता. आज सकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार ठप्प होते. कांदा व दूथ रस्त्यावर फेकून शासनाच निषेध करण्यात आला. बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद होती. एरंडगाव येथे बंद पाळून भारतीय जनता पक्षाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

शेतकरी रस्त्यावर
निमगाव मढ (ता. येवला), भालुर (ता. नांदगाव) येथे शेतकऱ्यांनी गावात फेरी काढून बंदचे अवाहन केले. गावात बंद पाळण्यात आला. नांदूरमधमेश्‍वर (ता. निफाड) रस्त्यावर ट्रक आडवा करुन रस्ता बंद करीत आंदोलन केले. कोकणगाव फाटा येथे साकोरा, शिरसगाव, वडाळीनजीक तसेच पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आंदोलनात भाग घेऊन बंदचे आवाहन केले. त्यानंतर पोलिस निरिक्षक देसले यांना निवेदन देण्यात आले. वनसगाव येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर टाळ मृदुंगासह भजन केले. घोटी (ता. ईगतपुरी) येथेही आंदोलन झाले. व्यापारी पेठे बंद पाळण्यात आला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com