Farmers Questioning Girish Mahajan's Drought Review Tour | Sarkarnama

पालकमंत्री गिरीश महाजन दुष्काळात सेल्फी अन्‌ सत्काराला आले होते का? दुष्काळग्रस्तांचा प्रश्न!

संतोष विंचू 
मंगळवार, 14 मे 2019

पालकमंत्री गिरीश महाजन जामनेरला जाता जाता दुष्काळ दौऱ्यानिमित्त येवल्याच्या दुष्काळ दौऱ्यावर आले होते. त्यामुळे तालुक्‍यात सगळ्यांनाच हायसे वाटले. दौऱ्यानंतर काहीतरी पदरी पडेल, असेही वाटले. मात्र, आठवडा उलटूनही दौऱ्यात दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण झालेले नाही.

येवला : पालकमंत्री गिरीश महाजन जामनेरला जाता जाता दुष्काळ दौऱ्यानिमित्त येवल्याच्या दुष्काळ दौऱ्यावर आले होते. त्यामुळे तालुक्‍यात सगळ्यांनाच हायसे वाटले. दौऱ्यानंतर काहीतरी पदरी पडेल, असेही वाटले. मात्र, आठवडा उलटूनही दौऱ्यात दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण झालेले नाही. त्यामुळे दुष्काळात होरपळणाऱ्या संतप्त कार्यकर्ते, शेतकरी 'पालकमंत्री महाजन सेल्फी काढायला अन्‌ सत्कार घ्यायला आले होते का?', असा प्रश्‍न विचारू लागले आहेत.

येवल्यात टॅंकरग्रस्त गावे-वाड्यांची संख्या शंभरावर पोचली आहे. जनावरांसाठी टॅंकरची मागणी गावागावांतून होत आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होतेय. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव नेऊर येथे युवकांसोबत सेल्फीचा आनंद घेत आढावा बैठक घेतली. तालुक्‍यातील देशमाने, सावरगाव, चांदगाव, नगरसूल, राजापूर रस्त्यावरील गावात त्यांनी दुष्काळावर चर्चा केली.

चांदगाव येथे मोठी पंगतही उठली; पण ज्यांनी निवेदने दिली आणि टंचाईसंदर्भात गाऱ्हाणे मांडले त्या सर्वांच्या हातात तुऱ्याच मिळाल्याचे आठवड्यानंतर दिसते आहे. टॅंकरची संख्या वाढावी, पुरेशा प्रमाणात पाणी मिळावे आणि गावोगावी चारा छावण्या सुरू व्हाव्यात, ही प्रमुख्याने दौऱ्यातील मागणी होती. मात्र, यातील एकही मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे हा दौरा म्हणजे निव्वळ फार्स ठरल्याच्या तक्रारी गावोगावी शेतकरी करीत आहेत. 

मंत्र्यांनी दौरे करण्यापेक्षा दुष्काळासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा द्यावा, असे आता नागरिक उघडपणे बोलू लागले आहेत.  दौरा दुष्काळी उपाययोजनांसाठी असला, तरी यात नागरिकांनी निवेदने दिली. मांजरपाड्यासह कालव्याचे काम पूर्ण होण्याची मागणी केली. सर्व ठिकाणी यावरच महाजन यांनी पावसाळ्यात पाणी येईल, असे आश्‍वासन दिले. पण सद्यःस्थितीत काय करणार, यावर ठोस निर्णय न दिल्याने हा दौरा फक्त दिखाऊ होता का?, असा सवाल उपस्थित होत आहे. तालुक्‍यात चारा छावण्या सुरू करण्याची मागणी महिन्यापासून सुरू आहे. 

तहसीलदारांनी बाजार समितीला पत्र देऊन हात झटकण्याची भूमिका पार पाडली. पुढे यावर धोरणात्मक निर्णय न झाल्याने आजही उत्तर- पूर्व भागात जनावरांचे चारा-पाण्याअभावी प्रचंड हाल सुरू आहेत. काही पशुपालक विकत पाणी घेऊन जनावरांची तहान भागवत आहेत. चाऱ्यासाठी रोज हजारो रुपये शेतकऱ्यांवर खर्च करीत आहेत. अजून पंधरा दिवसांनी पावसाचे आगमन होईल. जोरदार पाऊस झाल्यास परिस्थितीत सुधारणा होईल, पण प्रशासन आणि शासन वेळकाढूपणा करीत असल्याने नागरिकांना टंचाईसह दुष्काळाच्या झळा सहन करताना नाकीनऊ येत आहेत. 

पालकमंत्र्यांचा दुष्काळी नव्हे तर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींचा दौरा होता. त्यात भोजनावळी अन्‌ फोटोसेशन झाले. विशेष म्हणजे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जे प्रकल्प 80-90 टक्के पुर्ण केले ते आता निवडणुकीच्या तोंडावर पुर्ण करण्याचे गाजर दाखवले जात आहे. दौऱ्यानंतर काहीच दिलासा नसल्याने दौऱ्याची फलनिष्पत्ती काय हा प्रश्‍नच आहे - सुनिल पैठणकर, युवा नेते, नगरसूल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख