Farmers' owners have no problem with the purchase; Contact If: Arjun Khatkar | Sarkarnama

शेतकऱ्यांच्या माल खरेदीत कुठलीही अडचण नाही; असल्यास संपर्क साधा : अर्जुन खोतकर

 जगदीश पानसरे
गुरुवार, 26 मार्च 2020

कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून मी हे विश्वासाने सांगू शकतो की , कुठल्याही शेतकऱ्याचा भाजीपाला खरेदी विना पडून आहे असे नाही. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज ,मालांची आवक ,खरेदी-विक्री रोजच्या प्रमाणे सुरू आहे .

 औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरासह राज्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे .मात्र यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्यामुळे सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे व्यवहार सुरळीतपणे सुरू आहेत. शेतकरी भाजीपाला घेऊन मार्केट कमिटीमध्ये येत असून तो व्यापाऱ्यांकडून खरेदीही केला जातोय. 

त्यामुळे शेतकऱ्याचा माल पडून आहे आणि त्याचे नुकसान झाले असे चित्र कुठेही नाही .जर काही भागात अडचणी असतील तर शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आम्ही तो माल खरेदी करण्याची तात्काळ व्यवस्था करू असा विश्वास शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

अर्जुन खोतकर म्हणाले,  लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर धनधान्य, भाजीपाला, दूध फळे आणि दैनंदिन वस्तू यात कुठलीही अडचण येऊ नये याची खबरदारी राज्य सरकारने घेतली आहे.

थोडा फरक फळांच्या बाबतीत दिसून येतो, नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे जालना जिल्ह्यात व इतर भागात अंगुराचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे फळबाग शेतकऱ्याकडे शिल्लक असलेला अंगूर बाहेरच्या राज्यात कसा पाठवायचा याचा आम्ही विचार करतो आहोत .

एकरी एक ते सव्वा लाख एवढा खर्च करून अंगुराचे पीक घेतलेले आहे .परंतु त्याला बाजारात उठाव नसल्यामुळे थोड्याफार प्रमाणात याला फटका बसला आहे . लॉकडाऊन असल्यामुळे व्यापाऱ्यांच्या अंगूराचे ट्रक आपण जिल्ह्याच्या बाहेर काढून देऊ शकतो. 

परंतु जर एखाद्या शेतकऱ्याला किंवा व्यापाऱ्याला त्याचा अंगूर बाहेरच्या राज्यात विकायचा असेल तर त्याची अडवणूक होता कामा नये. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच दादा भुसे यांच्याशी बोलणार असल्याचेही अर्जुन खोतकर यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख