शेतकऱ्यांचे 'नाइट लाइफ' अनुभवायचे... तर या बेलोऱ्यात!

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या 'नाइट लाइफ'बद्दल सरकारला मात्र कुठलीही चिंता दिसत नाही. ग्रामीण भागात दिवसा लाइट अर्थात वीज नसल्याने पिकांच्या सिंचनासाठी अतिशय वाईट अवस्था आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 'नाइट लाइफ' नाइलाजाने सुरू ठेवावे लागते
Farmers Working at Night in Field
Farmers Working at Night in Field

पुसद (जि. यवतमाळ) : मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटन शहरात 'नाइट लाइफ'ची मजा लुटण्यासाठी पैशांचा अगदी पाऊस पडतो. त्यातून महसूल गोळा होतो. म्हणून राज्य शासनाने आता मनमौजींसाठी 'नाइट लाइफ'ची सुविधा उपलब्ध करून दिली. डीजेवरील गाण्यांची धकधक... शॅंपेनचे उडणारे फवारे अन्‌ रात्रभर थिरकणारे धुंदफुंद नृत्य... अंधारातील रंगीबेरंगी प्रकाशाचा खेळ... यालाच 'नाइट लाइफ' असे नाव.

जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या 'नाइट लाइफ'बद्दल सरकारला मात्र कुठलीही चिंता दिसत नाही. ग्रामीण भागात दिवसा लाइट अर्थात वीज नसल्याने पिकांच्या सिंचनासाठी अतिशय वाईट अवस्था आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 'नाइट लाइफ' नाइलाजाने सुरू ठेवावे लागते. या 'नाइट लाइफ'मध्ये शेतातील रातकिड्यांचे किर्रर गाणे... अंधारातील काजव्यांचे नृत्य... साप-विंचवासारख्या विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांची वळवळ आणि वन्य हिंस्र प्राण्यांची सळसळ यामुळे हे 'नाईट-लाईफ' केव्हाही जिवावर बेतणारे. परंतु, पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात खऱ्याअर्थाने 'रात्रंदिन' राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या धाडसाला व धैर्याला सलाम करावा लागेल.

पुसद तालुक्‍यातील बेलोरा शेतशिवारात दिवसा वीज उपलब्ध होत नसल्याने रात्रभर शेतकरी सिंचनासाठी शेतात सतत कष्ट वेचत असतो. या परिसरात गहू, हरभरा, हळद अशी रब्बी पिके शेतकरी घेत आहेत. विहिरी, तलाव, बंधारे हे जलस्रोत यंदा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवीत असतानाच वीज महावितरण कंपनीने मात्र शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना 24 तास वीज देण्याचा वादा केला असला, तरी प्रत्यक्षात दिवसा आठ-आठ तास वीज गुल राहते. त्यामुळे दिवसभर सिंचन करणे शक्‍य होत नाही. अशास्थितीत नाइलाजाने शेतकऱ्यांना रात्रपाळीत सिंचन करावे लागते. रात्रीच्या अंधारात जिवावर उदार होऊन शेतकरी रात्रीचा दिवस करतात व पीक काढतात. अर्थातच या 'नाईट लाईफ'मुळे शेतकऱ्यांची झोप होत नाही. डोळ्यात झोप घेत दिवस पाळीत मशागतीची कामे संपत नाहीत. ओघानेच शेतकऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.

बेलोरा येथील 62 वर्षीय शेतकरी शहाजी घोलप यांच्या शेतात दोन एकर गहू, दोन एकर हरभरा असून, त्यांनी आता उन्हाळी भुईमुगाची लागवड केली आहे. पाण्याची उपलब्धता आहे. परंतु, दिवसा वीज मिळत नसल्याने ते आपल्या मुलांसह रात्री साडेआठ वाजता शेती पिकात तुषार संच सुरू करतात. त्यांची 'नाईट लाइफ' दिवस उजाडण्यापर्यंत संपता संपत नाही. अशावेळी घर मालकिनीच्या डोळ्यात चिंता साठलेली असते. हीच परिस्थिती तालुक्‍यातील सर्वच ग्रामीण भागात अनुभवास येते. शेतकऱ्यांच्या 'नाइट लाइफ'चा अनुभव घ्यायचा असेल, तर मंत्री, खासदार, आमदार, उच्चपदस्थ अधिकारी यांनीही बेलोऱ्यात यावे, अशी शहाजी घोलप व त्यांच्या शेतकरी मित्रांची विनवणी आहे.

..शेतकरी राजा...
तुई 'नाईट लाइफ' लई भारी
अंधाऱ्या राती, छातीला माती
नाचती तुषार थुईथुई....
तू गोंजारतो रातभर पिकांना
वाट सारखी पाहे बाईल घरी..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com