Vadettiwar-Mungantivar
Vadettiwar-Mungantivar

वाघाच्या जीवापेक्षा शेतकऱ्यांचा जीव महत्त्वाचा :  कॉंग्रेसच्या  वडेट्टीवारांकडून  मुनगंटीवारांची पाठराखण  

वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस नेत्यांच्या विरोधात भूमिका स्पष्ट केली व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कृतीचे समर्थन केले.

नागपूर :  यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील वनक्षेत्रात अवनी वाघिणला ठार करण्याच्या मुद्यावरून कॉंग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पाठराखण केली. 

आमदार वडेट्टीवार यांच्या या भूमिकेमुळे कॉंग्रेसमधील या मुद्यावर असलेली मतभिन्नता समोर आली आहे.अवनी वाघिणने या क्षेत्रातील 13 शेतकऱ्यांना ठार केले होते. यामुळे वनखात्याने या वाघिणीला ठार मारण्यासाठी शिकारी नवाब शाफत अली याला पाचारण केले होते. 

अवनीला ठार मारल्यानंतर वन्यप्रेमींनी विरोध सुरू केला. यावर केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी राज्य सरकारवर टीका केल्याने देशभरात राज्य सरकारच्या या कृतीचा निषेध सुरू आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनीही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर तोफ डागली होती. 

परंतु वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेस नेत्यांच्या विरोधात भूमिका स्पष्ट केली व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कृतीचे समर्थन केले. वाघाच्या जीवापेक्षा शेतकऱ्यांचा जीव महत्त्वाचा आहे. जंगलाच्या क्षेत्रातील शेतकरी जीव मुठीत घेऊन राहतात. वाघ जगला पाहिजे, ही भूमिका योग्य असली तरी वाघापेक्षा माणसांचा जीव महत्त्वाचा आहे, अशी भूमिका आमदार वडेट्टीवार यांनी मांडली.

संजय निरुपम यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर तस्कराशी संबंध असल्याचा आरोप केला होता. अवनीच्या प्रकरणावर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करून राज्य सरकारच्या कृतीचा निषेध केला होता. कॉंग्रेसचे सर्व नेते अवनीच्या समर्थनार्थ भाजपला घेरण्याचा प्रयत्न करीत असताना आमदार वडेट्टीवार यांनी मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ बाजू घेतल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

अवनी वाघिणला मारण्याची पद्धत चुकीची होती, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. अवनीला बेशुद्ध करून पिंजऱ्यात ठेवले असते तरी पर्यटकांची संख्या वाढली असते, अशी सूचना त्यांनी केली. गेल्या चार वर्षात विदर्भात 26 वाघ मरण पावले असून यासाठी राज्य सरकार जबाबदार असून वाघांचे संरक्षण करण्यात सरकार अपयशी ठरले. शेतकऱ्यांना रोजीरोटीसाठी जंगलात जावे लागत आहे. सरकार त्यांना रोजगार देण्यात अपयशी ठरले आहे. वनखात्यासाठी स्वतंत्र मंत्र्यांची आवश्‍यकता असल्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावेळी किशोर गजभिये व अतुल लोंढे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com