Farmers given additional benefits :Sadabhau khot | Sarkarnama

कडधान्यांनाही लवकरच आडतमुक्ती : कृषी राज्यमंत्री  खोत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 एप्रिल 2017

आगामी काळात गावपातळीवर शेतकरी कंपन्यांना गोदामाची सुविधा देण्यासह ग्रेडिंग, पॅकिंग आणि साठवणूक याद्वारे गावातच बाजारपेठा निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत.

सोलापूर: "शेतकरी गट, कंपन्या यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करुन गावातच बाजारपेठा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यावर लादलेली सगळी जोखडं आम्हाला उतरावयाची आहेत. भाजीपाल्याची आडत रद्द केल्यानंतर आता कडधान्यांची आडतही लवकरच हटवली जाईल, त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरु आहेत. ,' असे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शनिवारी (ता.8) येथे सांगितले.

"उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान' या उपक्रमाचे उदघाटन मंत्री खोत यांच्या हस्ते येथील अशोक कल्याणी यांच्या शेतात झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, आमदार हरिष पिंपळे, विभागीय कृषी सहसंचालक विजयकुमार इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, अशोक कल्याणी आदी उपस्थित होते.

श्री.खोत म्हणाले,""उन्नत शेती अभियान हे सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. कृषी विकास व उत्पादन वाढीसाठी तालुका हा घटक यामध्ये ठेवण्यात आला आहे. गाव पातळीवरील 10 हेक्‍टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिकातून तंत्रज्ञान प्रसार करण्यासह सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकांकरता बियाणे, खते, किटकनाशके, अनुदानित अवजारे खुल्या बाजारातून खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. आगामी काळात गावपातळीवर शेतकरी कंपन्यांना गोदामाची सुविधा देण्यासह ग्रेडिंग, पॅकिंग आणि साठवणूक याद्वारे गावातच बाजारपेठा निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत. यंदा तुरीचे उत्पादन वाढले, जवळपास 30 लाख क्विंटल तुरीची खरेदी झाली, तरीही सगळी तूर आम्ही खरेदी करणार आहोत.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख