farmers dialed call to ajit pawar and save Rs 10 lakh in Pune | Sarkarnama

`त्या’ दादांऐवजी लावला `या’ दादांना फोन लागला आणि शेतकऱ्यांचे दहा लाख रुपये वाचले

भरत पचंगे
गुरुवार, 26 मार्च 2020

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शब्दामुळे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक लूट थांबली...

शिक्रापूर :  शिवसेना युवा सेनेचे माजी तालुकाध्यक्ष संजय पवार यांनी आज केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या एका फोनने शिरुर तालुक्यातील (जि.पुणे) १४ गावांचे सुमारे दहा लाख रुपये वाचले. कोरोनाची भीती दाखवून हार्वेस्टरचालकांनी अचानक वाढविलेल्या एकरी दिड हजार रुपयांच्या भाववाढीला निर्बंध आले.

अर्थात दादांच्या फोनच्या दहशतीने पेट्रोलपंपचालकांसह पोलिसांनीही नरमाई दाखवत शेतक-यांसाठी डिझेल देण्यासाठी संमती दर्शविली. गंमत म्हणजे संजय पवार यांनी अशा संकटसमयी माजी खासदार शिवाजीराव आढळराव दादा यांचा फोन डायल केला असता तो लागला नाही. म्हणून मग त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच डायल केला, दादांनी फोन केला आणि काम फत्ते झाले.  

अवकाळी पावसाने शिरुर तालुक्यातील पूर्व भागात गहू काढण्याची लगबग सुरू आहे. त्यातच कोरोनामुळे शेतक-यांसह सर्वांच्याच फिरण्यावर प्रतिबंध येतानाच गहू काढण्याच्या काळजीने अनेक शेतकरी आज बाहेर पडले. यात गव्हासाठी हार्वेस्टर चालकांकडे चौकशी केली असता सर्वांनी एकरी दोन हजारचे साडेतीन हजार द्यावे लागतील, असे सांगायला सुरवात केली. याचे कारण असे की, पेट्रोलपंपावर या मंडळींना डिजेलच देण्यासाठी पोलिसांचे निर्बंध होते.

अशा वेळी शिवसेना युवा सेनेचे माजी तालुकाध्यक्ष संजय पवार हे पुढे आले आणि त्यांनी डिजेल का दिले जात नाही म्हणून चौकशी सुरू केली. मांडवगणजवळील एका पंपावर गेले असता त्यांनी ही तक्रार करण्यासाठी माजी खासदार व शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांना फोन केला. मात्र त्यांचा फोन लागला नसल्याने सोबत असलेल्या शेतक-यांच्या आग्रहाने त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कॉल करीत पंप व्यवस्थापकाकडे ते गेले. थेट दादांचा फोन दिसल्यावर मॅनेजर तसेच सोबत असलेले पोलिसही गडबडले. यावेळी दादांनी स्पष्ट सांगितले की, शेतीच्या कामासाठी लागणा-या डिझेलसाठी कुणीही अडवू नये. तसेच ही बाब जिल्हाधिका-यांनाही सांगितल्याचे त्यांनी या फोनवर सांगितले. स्पिकरफोनवर सुरू असलेल्या या सर्व फोनाफोनीच्या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमिवर हार्वेस्टर चालक-मालकांचा डिजेलचा प्रश्न मिटला आणि कोरोनाची भिती दाखवून केलेली कृत्रीम भाववाढही संपली.

या बाबतीत बोलताना संजय पवार यांनी सांगितले की, आमच्या वडगाव रासई-मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटातील सुमारे १४ गावांमध्ये जवळपास २५० हेक्टर गहू आहे. तो तातडीने काढणे गरजेचे असल्याने त्यासाठे याभागात सहा ते सात हार्वेस्टर कार्यरत आहेत. या सर्वांनी मिळून प्रती एकर दिड हजार रुपये भाव वाढवून घेतले असते तर आमच्या एकाच गटातील जवळपास दहा ते अकरा लाख रुपये अतिरिक्त गेले असते. शेतक-यांसाठी अशा छोट्या गोष्टीही मोठा परिणामाच्या असतात. मात्र महाआघाडीचे सरकार आहे. या दादांचा नाही लागला तरी त्या दादांचा फोन लागल्याने आमचे सुमारे दहा लाख वाचतात हे आमच्यासाठी आणि तमाम शेतक-यांसाठी या कोरोनाच्या भीषण स्थितीत सुखावह आहे.

वाचा आधीची बातमी- अजितदादांचा फोन गेला आणि काम झाले

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख