Farmer's daughter's hunger strike | Sarkarnama

अन्नत्याग आंदोलनाच्या पाचव्या दिवशीही पुणतांब्यातील कृषीकन्या आंदोलनावर ठाम...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

नगर : एक कायद्याचा अभ्यास करतेय. इतर दोघी बीएसस्सी करताहेत. अवघ्या 19 ते 20 वयोगटातील त्या तिघींनी पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्या अडून बसल्या आहेत. ज्या पुणतांब्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आंदोलन गाजविले, त्याच पुणतांबे (ता. कोपरगाव) येथून या कृषीकन्या आपले आंदोलन करत आहेत. 

नगर : एक कायद्याचा अभ्यास करतेय. इतर दोघी बीएसस्सी करताहेत. अवघ्या 19 ते 20 वयोगटातील त्या तिघींनी पाच दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी त्या अडून बसल्या आहेत. ज्या पुणतांब्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आंदोलन गाजविले, त्याच पुणतांबे (ता. कोपरगाव) येथून या कृषीकन्या आपले आंदोलन करत आहेत. 

शुभांगी संजय जाधव, निकिता धनंजय जाधव व पुनम राजेंद्र जाधव या पुणतांबे येथील तिघीही 19 ते 20 वयोगटातील युवती. शुभांगी व पुनम बीएसस्सी करते, तर निकिता कायद्याचे शिक्षण घेत आहे. तिघींनीही पाच दिवसांपूर्वी पुणतांब्यात अन्नत्याग आंदोलन (उपोषण) सुरू केले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, संपूर्ण कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी, कृषीसंलग्न वस्तुंवरील जीएसटीतून माफी, सुक्ष्मसिंचन, कृषी अवजारांवरांना शंभर टक्के अनुदान, शेतीमालाला हमीभाव मिळावा, दुधाचे दर वाढून मिळावेत, अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या आहेत. 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणला उपोषण सुरू असतानाच या तिन्ही मुली उपोषणाला बसल्या. हे आंदोलन गाजत असल्याने या तिघींकडेही प्रशासनाचे विशेष लक्ष गेले नाही. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांनी मोर्चाही काढला. ग्रामस्थांनी भीक मांगो आंदोलन केले. परंतु तरीही प्रशासनाने त्यांची विशेष काळजी घेतली नाही. काल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी त्यांची भेट घेवून सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या योजनांची माहिती दिली. आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, परंतु त्या आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. काल तिघींपैकी शुभांगी हिला उपचारार्थ रुग्णालयात हलविले. 

पुणतांब्याचा आंदोलनाचा इतिहास 
दुधाला वाढीव दर मिळावा, यासाठी पुणतांबे येथून शेतकरी आंदोलनाने महाराष्ट्राला धडा दिला. किसान क्रांती शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली हे आंदोलन झाले. संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. त्यामध्ये धनंजय जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. जाधव यांच्या कन्या निकिता हिने वडिलांचा कित्ता गिरविला. युवतींना संघटित करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढ्यास ती उभी राहिली आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकरी आंदोलनाच्या इतिहासात पुणतांब्याचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल. 

पाचव्या दिवशी येणार पालकमंत्री 
पालकमंत्री प्रा. राम शिंदे आज (शुक्रवारी) आंदोलनस्थळी येणार आहेत. सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांची माहिती ते देतीलही. परंतु त्यांच्या सांगण्यावरून या उपोषण सोडतील का, याबाबत ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख