हौशी नेत्यांचे अतिवृष्टी पर्यटन : बळीराजा म्हणतो , मदत नको कॅमेरा आवर ! 

..
maize damage.
maize damage.

भोकरदन :  गेल्या दहा दिवसात तालुक्यासह सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाली यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. भोकरदनच काय महाराष्ट्रातील  गावागावात पिकांचे वाटोळे झाले आहे. 

 या नुकसानी पाठोपाठ नेत्यांची टोळधाड गावागावात अतिवृष्टीच्या पर्यटनावर निघाली आहे. राज्यस्तरीय नेते आल्याने शेतकऱ्यांनी  आपले दुःख व्यक्त केले . पण दररोजच नेते  अगदी  नगरसेवकही  यायला लागल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे . 

शहरी भागातील काही नेते तर शेतकऱ्यांना नुकसान झालेले पीक कोणते ? इथपासून ते तुम्ही पिकाची आधीच काढणी का केली नाही वगरे काहीही प्रश्न विचारून शेतकऱ्यांना भंडावून सोडत आहेत .

शेतकऱ्यांबरोबर सेल्फी काढणारे काही महाभाग आहेत . पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे मोबाईलवर मुंबईत सरकार कोणाचे बनणार यावर चर्चा  सुरूच असते .  शासनाला पंचनामे करायला सांगू , पीकविमा कंपन्यांना सांगू एवढे आश्वासन देऊन नेत्यांचे वाहनाचे ताफे चिखलातून वाट काढीत निघून जातात. शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देऊ करणारे अपवादानेच दिसतात . 

भोकरदन तालुक्यात शेतातील मक्याला अक्षरशः कोंब फुटले आणि शेतकऱ्याला  मदत मिळावी यासाठी सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली.  त्यात सोशल मीडियाचा जमाना! अगदी पंचनामा करण्यापासून तर झालेल्या नुकसानीचे सर्व फोटो व्हिडिओ, सोशल मीडियावर व्हायरल व्हायला लागले आहेत . 


मग गाव पातळी ,शहर पातळीवरील नेते कसे मागे राहतील सध्या सोशल मीडियावर जिकडे तिकडे मक्याचे कणीस हातात धरून ग्रुप फोटो दिसत आहे.  अगदी ग्रामपंचायत सदस्य ,उपसरपंच, सरपंच, पंचायत समिती सदस्य ,जिल्हा परिषद सदस्य थेट नगरसेवक सुद्धा !! यात आजी माजी दोन्ही पदाधिकारी आहेत हे विशेष . बर , सकाळी विरोधी पक्षाचे नेते आले की ही बातमी कळताच संध्याकाळी सत्ताधारी पक्षाचे नेते दाखल होतात .  हौशी नेत्यांच्या या  अतिवृष्टी पर्यटनाला वैतागलेला  बळीराजा मात्र म्हणतोय म्हणतो , मदत नको तुझा कॅमेरा आवर ! 

भोकरदन तालुक्यात तर जणू काही स्पर्धाच लागली आहे आपापल्या सर्कलचे फोटो काढून आपापल्या पक्षाच्या, नेत्यांच्या व्हाट्सअप वर टाकून मी काय काम करतो याची जणू काही पोचपावती त्यातून दिली जात आहे की काय अशी परिस्थिती आहे .

परंतु मूळ प्रश्न बाजूलाच राहत आहे. ज्या प्रमाणात नुकसान झाले आहे; त्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळणार का? या फोटो काढणाऱ्या राजकीय मंडळींनी किमान शेतकऱ्यांचे पीक विम्याचे फॉर्म, सातबारे आदि कागदोपत्री प्रक्रिया करण्यासाठी जरी हातभार लावला तर ती खरी मदत राहील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com