नीरा कालव्याला पाणी नसल्याने इंदापूर बॅंकेच्या संचालकाची आत्महत्या; मंत्री बापट, शिवतारेंना धरले जबाबदार

नीरा कालव्याला पाणी नसल्याने इंदापूर बॅंकेच्या संचालकाची आत्महत्या; मंत्री बापट, शिवतारेंना धरले जबाबदार

वालचंदनगर : इंदापूर अर्बन बॅंकेचे विद्यामन संचालक व शेतकरी वसंत सोपाना पवार (वय ४८, रा.बेलवाडी ) यांनी पाटबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी मिळत नसून पिके जळत असल्यामुळे विहिरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली. पवार यांनी आत्महत्यापूर्वी दोन चिठ्या लिहून ठेवल्या असून आत्महत्येस जबाबदार असणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असून यामध्ये जलसंपदाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व पालकमंत्री गिरीष बापट यांच्या नावाचा समावेश आहे.
 
वालचंदनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार वसंत पवार यांचे लासुर्णेमध्ये हार्डवेअर व शेतीच्या औषधे व खतांचे दुकान आहे. तसेच त्याची लासुर्णे व बेलवाडी परीसरामध्ये शेती आहे. शनिवार(ता.२१) रोजी ते दुकानबंद केल्यानंतर घरी गेलेच नव्हते. घरातील नागरिकांनी रात्रभर शोध घेतला मात्र ते आढळून आले नाहीत. आज रविवार (ता.२२) रोजी सकाळी त्यांचा मृतदेह बेलवाडी गावच्या हद्दीतील जामदारवस्तीजवळील विहिरीमध्ये पाण्यावरती तरंगत असल्याचा दिसून आला.

पोलिसांनी तातडीने मृतदेह पाण्यातुन बाहेर काढल्यानंतर त्यांच्या खिशामध्ये दोन चिठ्या आढळल्या आहेत. यामध्ये गेल्या दोन वर्षापासुन उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी कालव्याचे पाणी मिळाले नसल्यामुळे पिके जळाली आहेत. कर्जबाजारी झाल्यामुळे आर्थिक अडचणीमध्ये आल्यामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करीत आहेत.

मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

गतवर्षी व चालू वर्षी ही नीरा डाव्या कालव्यातुन उन्हाळी हंगामाची पाणी वेळेत न मिळाल्यामुळे आत्महत्येस जबाबदार असणारे जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व पालकमंत्री गिरीष बापट यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी पवार यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवली आहे.

नेत्यांनी आवाज उठवावा..

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील,पंचायत समिती सदस्य अॅड.हेमंतराव नरुटे,कर्मयोगीचे संचालक वसंत मोहोळकर, दुधगंगाचे माजी अध्यक्ष शहाजी शिंदे, उपसरपंच प्रकाश चव्हाण यांनी सरकारच्या विरोधातामध्ये  आवाज उठवून कुंटूबाला न्याय मिळवून देण्याची प्रयत्न करावा असे वसंत पवार यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले आहे.

जलसंपदा विभागाचा बेफाम कारभार 

जलसंपदा विभागाच्या विस्कळीत कारभारामुळे गतवर्षी लासुर्णे,बेलवाडी परीसरातील शेतकऱ्यांना नीरा डाव्या कालव्यातुन उन्हाळी पाण्याचे आवर्तन मिळाले नव्हते.यामुळे या परीसरातील सात हजार एकरातील पिके जळून खाक झाली होती.यावर्षीही  कालव्यातुन पाणी मिळण्यास विलंब होत आहे. वसंत पवार यांच्यासह  या परीसरातील शेतकऱ्यांनी १३ एप्रिल रास्तारोको करण्याचा इशारा दिला होता. मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी  ४२ व ४३ क्रंमाकाच्या वितरिकेला १७ व १९ एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र अधिकाऱ्यांनी पाणी सोडले नसल्यामुळे पिके जळण्यास सुरवात झाली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com