आमदार विजयकुमार गावित यांची कन्या खासदार तर; आता पत्नी, पुतणी, भावजय झेडपीत

hina gavit
hina gavit

नंदुरबार : येथील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार माजीमंत्री तथा आमदार विजयकुमार गावित यांच्या कुटुंबातून निवडणूक रिंगणात उतरले होते.

डॉ. गावित यांच्या पत्नी तथा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कुमुदिनी गावित या कोठली गटातून तर त्यांच्यासोबत पावला गणातून त्यांची पुतणी तथा माजी आमदार शरद गावित यांची कन्या अर्चना गावित पंचायत समितीसाठी व नांदर्खे गटातून जिल्हा परिषदेसाठी रिंगणात होत्या. धानोरा गटातून राजश्री गावित याही शरद गावित यांच्या कन्या आहेत. तर पातोंडा गटातून डॉ. गावित यांच्या भावजय विजया गावित तर भाऊ प्रकाश गावित कोरीट गणातून रिंगणात होते. एकुण पाच उमेदवार घरातीलच होते. त्यामुळे सत्ता काबीज करण्यासाठी घरातीलच सदस्य जास्त निवडून आणल्याचे समीकरण यातून स्पष्ट होते.

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी त्यांचे पुत्र युवानेते राम रघुवंशी यांना कोपर्ली गटातून उमेदवारी देऊन घराणेशाहीचा वारसाचा राजकीय श्रीगणेशा केल्याचे स्पष्ट झाले आहे. माजी आमदार श्री. रघुवंशी यांची राजकीय कारकिर्द तत्कालीन धुळे जिल्हा परिषदेच्या रनाळे गटातून झाली होती. त्यांच्या मुलाची राजकीय वाटचालही कोपर्ली गटातून सुरु झाली आहे. शहादा तालुक्यात मोतीलाल पाटील यांचा राजकीय वारसा म्हणून अभिजीत पाटील राजकारणात आले आहे. या निवडणुकीत त्यांनी म्हसावद गटातून उमेदवारी करत विजय मिळवला आहे. लोणखेडा गटातून सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळवले आहे.

तळोदा तालुक्यात माजी आमदार पद्‌माकर वळवी यांनीही कन्या सीमा वळवी यांचा राजकीय प्रवेश अमोनी गटातून निवडणूक लढवून करवून घेतला आहे. माजी उपाध्यक्ष सुहास नाईक यांनीही बुधावल गटातून यश मिळवले आहे.

अक्कलकुवा तालुक्यात आमशा पाडवी यांनी मुलगा शंकर पाडवी याला भांग्रापाणी गटातून जिल्हा परिषदेत उमेदवारी देऊन राजकीय वारसा चालवला आहे. धडगाव तालुक्यातून कात्री गटातून रतन पाडवी यांनी स्वत: आपली जागा अबाधित ठेवत विजयी झाले आहेत. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्ह्याचे पहिले अध्यक्ष रुपसिंग पराडके यांचे पुत्र विजय पराडके व गणेश पराडके यांनीही जिल्हा परिषदेत यश मिळवून राजकीय घराणेशाहीला अबाधित ठेवले आहे. आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनीही त्यांची पत्नी हेमलता पाडवी यांना तोरणमाळ गटातून उमेदवारी दिली होती. मात्र त्या तेथे पराभूत झाल्या.

नवापूर तालुक्यात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावित व त्यांच्या पत्नी संगीता गावित आणि माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे पुत्र मधुकर व अजित नाईक यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळवले आहे. एकंदरीतच विजयी उमेदवारांमध्ये राजकीय वारसांचा समावेश जास्त आहे. त्यामुळे सत्तेच्या विकेंद्रीकरणापेक्षा घराणेशाहीच्या या निवडणुकीत जास्त प्रभाव दिसून आला. अनेक वर्षे प्रामाणिक काम करणाऱ्यांच्या नशिबी यंदाही केवळ सतरंज्या उचलणेच आले आहे. अनेक जण यातून दुखावले गेले आहेत. आता त्यांची सोय नेते कशी लावतात हे नजिकच्या काळात दिसेलच.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com