निवडणुकीतील पैपाहुणे आणि पाहुण्यांचे मेहुणे! सासरे-जावईबापूंच्या दोन जोड्या रिंगणात - family politics in maharshtra assembly elction | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सरपंचपदाचे आरक्षण नव्यानेच होणार आणि प्रशासकांच्या कारभाराची चौकशीही होणार

निवडणुकीतील पैपाहुणे आणि पाहुण्यांचे मेहुणे! सासरे-जावईबापूंच्या दोन जोड्या रिंगणात

योगेश कुटे
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

पुणे : राज्याच्या विधानसभा निवडणुकीवर नेहमीप्रमाणे घराणेशाहीचा वरचष्मा आहे. अनेक नेते, त्यांचे पाहुणे, त्यांचे मेव्हणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बड्या नेत्यांचे सख्खे भाऊ, चुलतभाऊ, पुत्र, कोठे पिता, कोठे  मेव्हणे असे सारे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  एकमेकांचे रक्ताचे नातेवाईक असलेेले वेगवेगळ्या पक्षांकडूनही निवडणूक लढवित आहेत. 

पुणे : राज्याच्या विधानसभा निवडणुकीवर नेहमीप्रमाणे घराणेशाहीचा वरचष्मा आहे. अनेक नेते, त्यांचे पाहुणे, त्यांचे मेव्हणे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बड्या नेत्यांचे सख्खे भाऊ, चुलतभाऊ, पुत्र, कोठे पिता, कोठे  मेव्हणे असे सारे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  एकमेकांचे रक्ताचे नातेवाईक असलेेले वेगवेगळ्या पक्षांकडूनही निवडणूक लढवित आहेत. 

माजी मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांचे दोन्ही पुत्रे अमित आणि धीरज हे विधानसभा निवडणूक लढवित आहेत. अमित हे लातूर शहरातून आणि धीरज हे लातूर ग्रामीणमधून कौल मागत आहेत. या दोघांचे चुलतदाजी अतुल भोसले हे कऱ्हाड दक्षिणमधून दुसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचा सामना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी आहे. अमित देशमुख यांचे चुलते दिलीपराव यांच्या कन्येशी अतुल यांचा विवाह झाला आहे.

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव (जि. पुणे) येथून सातव्यांदा आमदार होण्याची तयारी करत असताना दुसरीकडे त्यांचे मेव्हणे प्रकाश डहाके हे राष्ट्रवादीकडून करंजा या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

बारामतीतून अजित पवार हे पण सातव्यांदा विधानसभेच्या रिंगणात आहेत. त्यांचा पुतण्या रोहित हा कर्जत-जामखेडमधून नशीब अजमावत आहे. परळीतील हाय व्होल्टेज फाईट ही पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या चुलत भावंडांत होत आहे. छत्रपती उदयनराजे आणि त्यांचे चुलतबंधू शिवेंद्रसिंहराजे हे अनुक्रमे  सातारा लोकसभा आणि सातारा विधानसभा मतदारसंघातून एकाच वेळी निवडणुकीचा सामना करत आहेत. 

विक्रम सावंत साठी इमेज परिणाम

युवक काॅंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम हे स्वतः पलूस-कडेगावमधून दुसऱ्यांदा निवडणूक लढवित आहेत. त्यांचे मावसभाऊ विक्रम सावंत हे जतमधून (जि. सांगली) नशीब अजमावत आहेत. त्यांचा सामना भाजपचे विलासराव जगताप यांच्याशी आहे. कदम यांचे दुसरे नातेवाईक संजय जगताप हे सासवडमधून राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याशी सामना करत आहेत. विश्विजित यांच्या बहिणीचा संजय जगताप यांचे ज्येष्ठ बंधू व पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ राजेंद्र यांच्याशी विवाह झाला आहे. कदम
यांच्यासह त्यांचे दोन्ही नातेवाईक हे काॅंग्रेसचे उमेदवार आहेत.

संदीप क्षीरसागर साठी इमेज परिणाम

निलंग्यामध्ये मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात त्यांचे काका अशोक पाटील निलंगेकर हे निवडणूक लढवित आहेत. तुळजापूर मतदारसंघातून भाजपकडून उभे असलेले राणा जगजितसिंह पाटील यांचे आत्येभाऊ राहुल मोटे हे राष्ट्रवादीकडून भूम-परांडा मतदारसंघातून उभे आहेत. बीडमध्ये काका-पुतण्यातील लढत लक्षवेधी होत आहे. येथे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना त्यांचा पुतण्या संदीप यानेच आव्हान दिले आहे. गेवराईमध्ये विजयसिंह पंडित यांच्याविरोधात त्यांचे काका बदामराव पंडित उभे आहेत. 

सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदारसंघात भाजपकडून जयकुमार गोरे आणि शिवसेनेकडून त्यांचे बंधू शेखर गोरे असा सामना रंगला आहे. या दोन भावांसाठी शिवसेना आणि भाजप हे दोन्ही आमनेसामने आले आहेत. जयकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शेखर गोरे यांच्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सभा घेणार आहेत. कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक हे भाजपकडून दुसऱ्यांदा रिंगणात आहेत. त्यांचे चुलतबंधू सम्राट महाडिक हे शिराळ्यातून आपले नशीब अजमावत आहेत.

सासरे-जावईबापू आणि मामा-भाचे

राष्ट्रवादीकडून माढा विधानसभा मतदारसंघात बबनदादा शिंदे हे पुन्हा शड्डू ठोकून आहेत. त्यांचे जावई संग्राम थोपटे हे काॅंग्रेसकडून भोरमधून तिसऱ्यांदा विधानसभेत जाण्याच्या तयारीत आहेत. अशीच सासरे आणि जावईबापूंची जोडी नगर जिल्ह्यात आहे. येथे भाजपकडून शिवाजीराव कर्डिले राहुरी मतदारसंघातून उभे आहेत. त्यांचे जावई संग्राम जगतार हे राष्ट्रवादीकडून उमेदवार आहेत. माढा येथील बबनदादा शिंदे यांचे बंधू संजय शिंदे हे करमाऴ्यातून अपक्ष लढत आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर येथून तर त्यांचे भाचे प्राजक्त तनपुरे हे राहुरीमधून निवडणूक लढवित आहे.

वसईमधून हितेंद्र ठाकूर तर त्यांचा मुलगा क्षितिज ठाकूर हे नालासोपारा मतदारसंघातून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. क्षितिज यांना माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्याशी सामना करावा लागत आहे.

 केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे भोकरदनमधून निवडणूक लढवित आहेत. दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव हे कन्नडमधून (जि. औरंगाबाद) तिसऱ्यांदा रिंगणात आहेत.  पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर हे भाजपकडून परतूरमधून तर त्यांचे जावई किशोर पवार हे कन्नडमधूनच नशीब अजमावत आहेत. नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मेव्हणे माजी आयएएस अधिकारी श्यामसुंदर शिंदे हे लोहा मतदारसंघातून रिंगणात आहेत. शिंदे यांनी या आधी विधान परिषदेवरही जाण्यासाठी प्रयत्न केला होता.

विदर्भातील कौटुंबिक संघर्ष!

दक्षिण-पश्चिम नागपूरमध्ये काॅंग्रेसकडून आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. त्यांचे काका अनिल देशमुख हे राष्ट्रवादीकडून काटोलमधून सहाव्यांदा लढत आहेत. नागपूर ग्रामीणमध्ये उमरेड मतदारसंघात सुधीर पारवे (भाजप) विरुद्ध राजू पारवे (काॅंग्रेस) अशी चुलतभावांतील लढत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मतदारसंघात नीलय नाईक (भाजप) विरुद्ध इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी) अशी पुन्हा चुलतभावांतील लढत लक्षवेधी ठरली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघात अत्राम कुटुंबातच लढत रंगली आहे. माजी मंत्री राजे अंबरीशराव (भाजप) विरुद्ध माजी मंत्री धर्मरावबाबा अत्राम या पुतण्या व काकांत लढत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघात माजी मंत्री संजय देवताळे हे शिवसेनेकडून व त्यांचे आत्येभाऊ सुभाष धोटे हे राजूर मतदारसंघातून काॅग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत.

कोल्हापूरचा तर वेगळाच पॅटर्न

चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील यांच्या विरोधात त्यांचे बंधू महेश हेच अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. याच मतदारसंघाचे दोनवेळा प्रतिनिधित्व केलेल्या आमदार संध्यादेवी कुपेकर ह्या राष्ट्रवादीच्या तर त्यांचे पुतणे संग्रामसिंह कुपेकर यांनी शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला आहे. जिल्हा बॅंकेत कॉंग्रेसचे म्हणून उपाध्यक्ष पदावर असलेले विनायक ऊर्फ अप्पी पाटील हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

 

सतेज पाटील-ऋतुराज पाटील साठी इमेज परिणाम

 

शाहूवाडीचे माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर व शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील हे सख्खे मावसभाऊ; पण आज श्री. सरूडकर यांचे पुत्र आमदार सत्यजित शिवसेनेकडून तर डॉ. पाटील यांचे नातू ऋतुराज कॉंग्रेसचे उमेदवार आहेत. कोल्हापूर दक्षिणचे भाजपचे उमेदवार अमल महाडिक व "शाहू-कागल'चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे हे मेहुणे-पाहुणे आहेत. श्री. घाटगे यांच्या भगिनी सौ. शौमिका ह्या श्री. महाडिक यांच्या पत्नी आहेत. श्री. महाडिक हे भाजपचे उमेदवार तर श्री. घाटगे हे भाजपचे बंडखोर म्हणून कागलच्या मैदानात उतरले आहेत.

इचलकरंजीचे भाजपचे आमदार सुरेश हाळवकर व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हे एकमेकांचे व्याही आहेत. श्री. हाळवणकर यांची पुतणी ए. वाय. यांची स्नुषा आहे; पण पक्षाच्या पातळीवर या दोघांची विचारसरणी वेगळी आहे. ए. वाय. यांचे मेहुणे (पत्नीचे भाऊ) माजी आमदार के. पी. पाटील हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर राधानगरीतून रिंगणात आहेत आणि त्यांच्या प्रचारात ए. वाय. सक्रिय आहेत. कोल्हापूर उत्तरचे कॉंग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी सौ. जयश्री व बंधू संभाजी हे दोघेही भाजपचे नगरसेवक आहेत. ऐनवेळी श्री. जाधव यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळाल्याने त्यांच्याही कुटुंबात दोन पक्ष असल्याचे दिसून येत आहे. हातकणंगले तालुक्‍यातील कॉंग्रेसचे उमेदवार राजूबाबा आवळे यांच्या विरोधात त्यांचे चुलत बंधू आणि "जनसुराज्य'चे माजी आमदार राजीव आवळे हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.

nilesh rane and nitesh rane साठी इमेज परिणाम
कोणत्या खासदारांचे कोण नातेवाईक विधानसभेच्या रिंगणात?

ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरातील अजित पवार व रोहित पवार
खासदार हिना गावित यांचे वडिल विजयकुमार गावित (नंदुरबार) 
खासदार सुजय विखे पाटील यांचे वडिल राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी)
खासदार रक्षा खडसे यांच्या भावजय रोहिणी खडसे (मुक्ताईनगर)
खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर (वरोरा) 

खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजर्षी पाटील (दक्षिण नांदेड)

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मेव्हणे श्यामसुंदर शिंदे (लोहा)
केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे भाचे रणधीर सावरकर (अकोला पूर्व)
खासदार नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे (कणकवली)
खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे(श्रीवर्धन)
खासदार श्रीकांत शिंदे यांचे वडिल एकनाथ शिंदे (ठाणे)
खासदार नवनीत राणा यांचे पती रवी राणा (बडनेरा)
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे आणि जावई हर्षवर्धन जाधव
खासदार प्रीतम मुंडे यांच्या भगिनी पंकजा आणि चुलतबंधू धनंजय मुंडे (परळी)
खासदार पूनम महाजन यांच्या आत्येबहिण पंकजा मुंडे

 

 
  

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख