The family fled after the murder, the troubled animal police became the savior | Sarkarnama

खुनाच्या घटनेने कुटुंब फरार, व्याकुळ जनावरांचे पोलिस बनले तारणहार

सुनील गर्जे
बुधवार, 22 एप्रिल 2020

घटनेनंतर संशयित फरार झाल्याने गावापासून दूर असलेल्या या वस्तीवर फक्त आवाज येतो तो चाऱ्या-पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या जनावरांचा. या वेळी त्यांच्या मदतीला धावून आली खाकी वर्दीतील पोलिस.

नेवासे : घरकारभारणीच्या हत्येचा गुन्हा दाखल होताच जिवापाड जपलेल्या जनावरांना वाऱ्यावर सोडून अख्ख्ये कुटुंब फरार झाले. याच वेळी चारा-पाण्याने व्याकूळ झालेल्या गायी-म्हशींना पोलिसच देवदूत म्हणून धावून आले. इतर वेळी हातात काठी असलेल्या पोलिसांच्या हाती ऊस कापण्यासाठी कोयता व घास कापण्याचा विळा आला. 

नेवासे तालुक्यातील तेलकुडगाव येथे एका वस्तीवर रविवारी (ता. १९) सकाळी एका विवाहितेचा मृतदेह घरासमोरील त्यांच्याच विहिरीत आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी घरातील पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला. घटनेनंतर संशयित फरार झाल्याने गावापासून दूर असलेल्या या वस्तीवर फक्त आवाज येतो तो चाऱ्या-पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या जनावरांचा. या वेळी त्यांच्या मदतीला धावून आली खाकी वर्दीतील पोलिस.

घटना घडल्यापासून घटनास्थळी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्याशिवाय कोणीही फिरकत नव्हते. कुकाणे पोलिस दुरक्षेत्रातील पोलिस हेड कॉन्स्टेबल भिमराज पवार व पोलिस कॉन्स्टेबल आंबादास गिते हे तपासकामासाठी वस्तीवर गेले असता त्यांना पाहून जनावरांनी हंबरडा फोडला. सहा गाई-म्हशी व आठ शेळया होत्या. शेतकरी पुत्र असलेले पवार व गीते यांनी या जनावरांच्या भावना ओळखून जवळच शेतात असलेले गींनी गवत, घास कापून व ऊस स्वतः तोडून त्यांना टाकला. पाणी पाजले.  

दरम्यान, पवार-गीते यांनी हे फक्त एकच दिवस नाही, तर रविवारपासून आजपर्य़ंत आपले रोजचे काम पाहून मिळालेल्या वेळात सकाळ - सायंकाळ न चुकता या जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करत आहेत. 

माणुसकीहीन समाजाचं दर्शन   
मयत महिलेचे माहेर-सासर एकच आहे. घटना घडल्यापासून या वस्तीवर पोलीस सोडून कोणतेच नातेवाईक फिरकले नाहीत. चारा-पाण्यावाचून व्याकुळ जनावरांच्या हंबरड्यांचा आवाज जवळच असलेल्या नातेवाईकांपर्यंत पोहचलाही असेल, मात्र गावातीलच वाद असल्याने कशाला डोळ्यावर यायचे, अशा भितीतून नातेवाई कुणीही या जनावरांना चारा-पाणी करण्यासाठी जवळ आले नाही, हे विशेष.

आम्ही शेतकरी पूत्र
"त्या कुटुंबियांचे कोणतेही नातेवाईक वस्तीवर येत नाहीत. त्यामुळे जनावरांचा चारा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. आम्ही शेतकरी पुत्र आहोत. घरी शेती, जनावरे असल्याने त्यांच्याविषयी आत्मियता व आवड आहेच. कर्तव्य बजवतांनाच या जनावरांनाची सेवा करीत असल्याचे खूप समाधान वाटते,`` असे मत पोलिस हेड काॅन्स्टेबल भिमराज पवार यांनी सांगितले.

पवार - गीते यांचे काैतुक
"पवार-गीते या दोघांचे खरच कौतुक केले पाहिजे. कोरोना बंदोबस्त, दररोजची कामे आणि गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्या जनावरांची सेवा. त्यांनी कर्तव्याबरोबरच मुक्या प्राण्यांविषयी जी माणुसकीची भावना दाखवली, ती निश्चितच कौतुकास्पद आहेत, अशा शब्दांत पोलिस निरीक्षक रणजीत डेरे यांनी या दोघांना शाबासकी दिली.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख