तोतया पीएंनी केले मंत्र्यांना त्रस्त!; नाशिकमधील अनेक किस्से चर्चेत 

तोतया पीएंनी केले मंत्र्यांना त्रस्त!; नाशिकमधील अनेक किस्से चर्चेत 

नाशिक ः जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचा पीए असल्याची बतावणी करणाऱ्या तोतया संदीप पाटील याला काल नाशिक पोलिसांनी अटक केली. यानिमित्ताने मंत्र्यांच्या मागे लागलेला तोतया पीए मंडळींचा ससेमिरा पुन्हा चर्चेत आला आहे . 

नाशिकमध्ये दोन दिवसांपूर्वी एका लॉजमध्ये संदीप पाटील नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसह आले. खोली घेतल्यावर ओळखपत्र न देताच निघून गेले. त्यानंतर मद्यप्राशन करुन आल्यावर त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. एव्हढेच नव्हे तर थेट पोलिस नियंत्रण कक्षात दूरध्वनी करुन पोलिसांनाही बोलावून घेतले. पोलिसही त्यांच्या रुबाबाला दडपले. मात्र या बातमीला पाय फुटल्यावर थेट मंत्री महाजन यांनीच कारवाईच्या केली. त्यानंतर पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी त्यांना अटक केली. 
धावपळीत आणि कामात व्यग्र असलेल्या मंत्र्यांबरोबर समारंभात फोटो काढून घ्यायचे. मंत्र्यांच्या पुढे-माघे फिरायचे. त्यांच्याशी लोकांसमोर वारंवार बोलायचे आणि मंत्र्यांच्या माघारी हे फोटो दाखवून आपण त्यांचे खाजगी सचिव आल्याची बतावणी करायची असा या तोतयांचा फंडा आहे. काही जण तर त्याहून चलाख असतात. साहेबांची बदल्यांची आणि "नेमणुकांची' कामे माझ्याकडेच असतात, असा प्रचार हे महाभाग करतात. अनेकदा या व्यक्ती मंत्र्यांच्या परिचयाच्या असतात. पण ते असे काही उद्द्योग आपल्या नावावर करीत आहेत हे मंत्र्याला कळेपर्यंत उशीर झालेला असतो. 

मंत्र्यांच्या तोतया "पीए'च्या घटना नवीन नाहीत. महिनाभरापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनाही त्यांच्या जवळचा म्हणून बतावणी करणाऱ्या इसमाचा असाच अनुभव आला . यापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या एका तोतया "पीए' ला पोलिसांनी अटक केली होती. त्याने अनेकांना टोपी घातली होती. "आर.आर.' यांचा भाचा असल्याची बतावणी करणाराही एक बहाद्दर निघाला होता. 

काही मंत्र्यांचे अनेक पीए असतात. मंत्रालयात एक, खासगी कामांसाठी वेगळा, मतदारसंघासाठी दुसरा तर पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यासाठी, ज्या खात्याचे मंत्री असतील त्या खात्यासाठी तिसरा पीए असल्याचे सगळ्यांच्या अगवळणी पडले आहे. त्यामुळे पीए खरे की खोटे यांच्या खोलात सर्वसामान्य माणसे सहसा पडत नाहीत . या व्यवस्थेशी रुळलेले काही लोक त्याचा गैरफायदा घेतात. त्याचा अनेकदा मंत्र्यांशी काहीही संबंध नसतो. मात्र मंत्र्याच्या जवळपास वावरून हे तोतया तशी हवा निर्माण करतात. त्यामुळेच असे प्रकार घडत आहेत.

 यापूर्वीच्या सरकारमध्ये एक मंत्री नाशिकचे असल्याने नाशिकला अशाच खऱ्या, अधिकृत, अनधिकृत अन अगदी तोतया पीएनी प्रशासन, नागरीक अन्‌ अगदी राजकीय नेत्यांनाही वेठीला धरलं होता. सध्या तर काही मंडळी थेट थैल्या गोळा करण्याचे काम करीत आहे. शहरात दोन ठिकाणी खासगी सदनिका भाड्याने घेऊन ही मंडळी राहतात. त्याची ही कामे राजरोस सुरु आहेत. त्यात शहरातील एक मोठी असामी असल्याने ते खरे की खोटे हे विचारण्याचे धाडस अगदी वरिष्ठ पोलिस अधिकारीही करु शकत नाही. तिथे सामान्यांची काय तऱ्हा. त्यामुळे या तोतयांना आवरा असे म्हणण्याची वेळ आली आहे. 
... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com