आमदार होण्यासाठी फडणविसांनी ठाकरेंना शुभेच्छा दिल्या...पण सूचकपणे `अडचण`ही सांगितली...

ठाकरे यांची विधान परिषदेच्या आमदारकीसाठी राज्यपाल कोट्यातून शिफारस करून आठ दिवस झाले तरी राज्यपालांनी यावर अद्याप निर्णय घेतला नाही....
devendra fadnavis-uddhav thackray
devendra fadnavis-uddhav thackray

पुणे : विधान परिषदेच्या जागेसाठी राज्यपाल नियुक्त दोन रिक्त जागांपैकी एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस मंत्रीमंडळाने केली आहे. मुळात या दोन्ही जागांची मुदत वर्षभराची असतानाच त्यावर नियुक्ती करण्यास राज्यपालांनी यापूर्वी नकार दिला होता. त्यातील एका जागेवर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. राज्यपाल कायद्यानुसार योग्य तो निर्णय घेतील. नियुक्ती करताना काही अपवाद करण्याचा आधिकारदेखील राज्यपालांना आहे. राज्यपाल काय घ्यायचा तो निर्णय घेतील. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीला माझ्या शुभेच्छा कायम आहेत, असे विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

येत्या २८ मे पूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांना विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य होणे कायद्याने आवश्‍यक आहे. अन्यथा त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या दोन रिक्त जागांपैकी एका जागेवर ठाकरे यांची नियुक्ती करावी, अशी शिफारस मंत्रीमंडळाने गेल्या आठवड्यात केली होती. 

या संदर्भाने फडणवीस यांनी वृत्त वाहिनीशी बोलताना भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘‘ ज्या दोन रिक्त जागा आहेत. या जागांची मुदत वर्षभराच्या आत संपणार आहे. इतका कमी कालावधी असलेल्या जागांवर नियुक्ती करायची की नाही याचा आधिकार राज्यपालांना आहे. त्यामुळेच यापूर्वी केलेल्या दोन नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंग काेश्‍यारी यांनी मान्य केलेली नाही.``

फडणवीस यांच्या या विधानामुळे अनेकांचे लक्ष वेधले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून सहा वर्षांपूर्वी विधान परिषदेवर राज्यपाल कोट्यावर निवडून गेलेले रामराव वडकुते यांनी विधान परिषद आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. दुसरे राहुल नार्वेकर यांनी भाजपत प्रवेश करून विधानसभेची आमदारकी पटकावली. या दोन्ही जागा रिक्त झाल्यामुळे राष्ट्रवादीने आदिती नलावेड आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली होती. त्या वेळी राज्यपालांनी या दोन्ही नावांना मान्यता दिली नाही. आता या जागेची मुदत जून 2020 मध्ये संपत असताना उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस मंत्रिमंडळाने केली आहे. ही शिफारस राज्यपाल मान्य करतील का, असे सारे प्रश्न उपस्थित होत आहेत. याकडेच फडणवीस यांनी अचूकपणे लक्ष वेधले आहे. 

फडणवीस यांनी याविषयी बोलताना हा राज्यपालांचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. राज्यपाल हे भाजपनियुक्त सरकारचे असल्याने ते काय निर्णय घेणार यावर राज्यातील पुढील समीकरणे ठरणार आहेत. ठाकरे यांच्या नावाची शिफारस करून आठ दिवस झाले तरी अद्याप राज्यपालांनी निर्णय घेतलेला नाही.

या परिस्थितीत राज्यात राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. घटनात्मक पेच उभा राहिला तर त्यात राज्यपालांची भूमिका सर्वात महत्वाची असते. त्यामुळे सध्या राज्यात कोरोनामुळे आरोग्यविषयक आणीबाणी असली तरी राजकीय पातळीवर राज्यपालांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष राहणार हे निश्‍चित.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com