फडणवीसांची मुत्सद्दी चाल : आता भाजपचे अस्त्र जयंत पाटलांवर 'बुमरँग' होणार

सांगलीकर अचंबित झालेत... आसपास कोणतीही युध्दाची लगबग नसताना सत्तेतील दोन दिग्गज येथे येवून तळ ठोकतात... त्यांचा हा अवकाळी ' सामना' रंगण्याचे इंगित काय? याचा अर्थ सांगलीकर शोधताहेत.अर्थात मुख्यमंत्र्यांनी आपली पलटण वाळव्याकडे कुच करून जयंतरावांना भविष्यातील 'कार्यक्रमा'ची झलक दाखविली. कार्यकर्त्यांनाही सांगितले आता जेजेपीचे दोर कापलेत यापुढे बीजेपी म्हणून लढा.शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या स्वारीचा हेतू उमगला नसला तरी भाजपला मनसोक्‍त धुण्याचा 'निरमा वॉशिंग कार्यक्रम' त्यांनी ठाकरीशैलीत पूर्ण केला. अर्थात आधी शरद पवार मग कॉंग्रेसची जनआक्रोशासाठीची मोठी पलटण, पाठोपाठ फडणवीस आणि ठाकरे अशा सलग स्वाऱ्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सांगली केंद्रस्थानी राहिली आहे. उध्दवजींची शाब्दीक तलावरबाजी खूब रंगली पण चर्चा आहे ती फक्‍त वाळव्यातील 'बंद खोली'तील कार्यक्रमाचीच!
devendra_and_jayant_pati
devendra_and_jayant_pati

सांगली : सांगलीकर अचंबित झालेत... आसपास कोणतीही युध्दाची लगबग नसताना सत्तेतील दोन दिग्गज येथे येवून तळ ठोकतात... त्यांचा हा अवकाळी ' सामना' रंगण्याचे इंगित काय? याचा अर्थ सांगलीकर शोधताहेत.

अर्थात मुख्यमंत्र्यांनी आपली पलटण वाळव्याकडे कुच करून जयंतरावांना भविष्यातील 'कार्यक्रमा'ची झलक दाखविली. कार्यकर्त्यांनाही सांगितले आता जेजेपीचे दोर कापलेत यापुढे बीजेपी म्हणून लढा.

शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या स्वारीचा हेतू उमगला नसला तरी भाजपला मनसोक्‍त धुण्याचा 'निरमा वॉशिंग कार्यक्रम' त्यांनी ठाकरीशैलीत पूर्ण केला.

अर्थात आधी शरद पवार मग कॉंग्रेसची जनआक्रोशासाठीची मोठी पलटण, पाठोपाठ फडणवीस आणि ठाकरे अशा सलग स्वाऱ्यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सांगली केंद्रस्थानी राहिली आहे.

उध्दवजींची शाब्दीक तलावरबाजी खूब रंगली पण चर्चा आहे ती फक्‍त वाळव्यातील 'बंद खोली'तील कार्यक्रमाचीच! 

'तुझे माझे जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना' याची प्रचिती म्हणजे युतीचे राज्यातील सध्याचे सरकार...रोज मोर्चे आंदोलने, वाद आणि अंगर्गंत धुसफुशीला तोंड देत एक फ्रेश चेहऱ्याचा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस गेली तीन वर्षे राज्याची गादी चालवत आहेत. या सर्व व्यापातून त्यांना राज्यात सर्वदूर पसरलेल्या रयतेकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळणे कठीणच!

त्यात जरा फुरसत काढून मोहिम आखली तर येथेही सेनेने आपला डेरा टाकलाच ! उध्दवजी त्यांचीपाठ काही सोडेनात. पण राजकारणातील शह-काटशहासाठी काही चाली खेळण्याची संधी मात्र ते अचूक हेरतात. इस्लामपूरवरील  मुख्यमंत्र्यांची  ही सलग दुसरी स्वारी भाजपचा राजकरणाचा परीघ वाढविणारी ठरेल काय, हे भविष्यात कळेल. पण सध्या जयंतरावांच्या तंबुतील हवा गरम झाली आहे.

आता चित्र बदलते आहे 

हुतात्मा समुहाला बळ देणे म्हणजे जयंतरावांच्या येथील साखरेवर आधारलेल्या साम्राज्याची कोंडी करणे आहे. प्रथम इस्लामपूर नगरपालिकेतील जयंतरावांची एक हाती  सत्ता नेस्तनाबूत करून भाजपने हादरा दिला.

तत्पूर्वी जिल्हा परिषदेचा गडही त्यांच्याकडून काढून घेतला. ग्रामपंचायतीत भाजप नंबर वनला गेला तर राष्ट्रवादी येथेही तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. निशिकांतदादांना नगराध्यक्ष करणे आणि सदाभाऊंना राज्यमंत्र्याची वस्त्रे देवून त्यांना जयंत साम्राज्यावर हल्ले चढविण्यासाठी बळ दिले.

राजू शेट्टी जयंतराव आणि राष्ट्रवादीविरोधात नरमले असले तरी त्यांचे काम आता निशिकांतदादा आणि सदाभाऊ करत आहेत. या सर्वामुळे जयंतराव जिल्ह्यात कोठेही न फिरता वाळव्याच्याच गडाची रखवाली करत बसल्याचे चित्र आहे.

भाजपच्या या रणनीतीमुळे तासगाव, कवठेमहांकाळ, आटपाडी, मिरज तालुक्‍यात कार्यकर्त्यांना जयंतराव आपली रसद पूर्ण ताकदीने पुरवू शकले नाहीत, ही वस्तुस्थितीच आहे. राज्य स्तरावर विधीमंडळात ते जी आक्रमकता दाखवत होते ती देखील भविष्यात बोथट करण्याची रणनीती फडणवीसांनी अवलंबिल्याचे दिसतेय. 

अर्थात ज्यांना यापूर्वीचे जयंतराव आणि  भाजपचे रिलेशन माहित आहे त्यांना हा धक्‍का आहे. कारण एककाळ असा होता की, इथल्या बिजेपीची 'जेजेपी' (म्हणजे जयंत जनता पार्टी) म्हणून थट्टा व्हायची. ऐतिहासिक दस्तावेज पाहिले तर त्यात तथ्यही होते.

कोठे मदन पाटलांची जिरवण्यासाठी, कोठे कॉंग्रेसची गोची करण्यासाठी जयंतरावांनी येथे  भाजपचा 'हत्यार 'म्हणून वापर केला. पण आता ते हत्यारच जयंतरावांसमोर आव्हान बनले आहे. कदाचित जयंतरावांनीही असा विचार कधी स्वप्नातही केला नसेल की, हे बुमरॅंग आपल्यावरच असे वापरले जाईल म्हणून!

पण आता समीकरणे बदलली. राष्ट्रवादीतून रेडीमेड नेते घेवून भाजप मोठी झाली तरी आता जयंतरावांचे यापैकी कोणी ऐकेल अशी स्थिती नाही. भविष्यात आता शिवाजीराव नाईकांना जर मंत्रिपद दिले तर जयंतरावांच्या आणखी अडचणी वाढू शकतात... पण ते भाजप शेवटच्या टप्यात करेल असा अंदाज आहे.

सध्या त्यांनी जयंतरावांचे एककाळचे विश्‍वासू पण सध्याचे कट्टर विरोधक  संभाजी पवार यांना इस्लामपूरासाठी सांगावा धाडून भेटणे ही गोष्ट काही किरकोळ नाही. या भेटीतूनही त्यांनी जयंतरावांनाच मेसेज दिला आहे.

नाईकवाडेंना पाठबळ  

यापैकी सर्वात मोठी गोष्ट आहे ती वैभव नायकवडी यांची! कॉंग्रेसला पण त्यांच्या पंधरा वर्षांच्या राजवटीत जमले नाही ते फडणवीसांनी केले. नागनाथअण्णा नायकवडींनी आपल्या आयुष्याभराच्या शिदोरीतून जो हुतात्मासारखा कारखाना उभारला त्याला भाजप सरकारने मोठी ताकद देण्यासाठी हात पुढे करावी ही गोष्ट ऐतिहासिक तितकीच सर्व समीकरणे बदलणारी आहे.

मुळात क्रांतीवीर नागनाथाअण्णा नायकवडी हे डाव्या विचारसरणीचे. त्यांचा हुतात्मा कारखाना म्हणजे सर्व डाव्या संघटनांचा जीव की प्राण असलेला केंद्रबिंदू... आता फडणवीस ठरले संघवाले. पण त्यांनी येथे येवून इथेनॉल प्रकल्पाचे उद्‌घाटन करणे आणि अण्णांच्या स्मारकासाठी 16 कोटीचा निधी जाहीर करण्याने अनेकांच्या भुवया वर गेल्या !

 अर्थात अण्णांनी उभारलेला कारखाना वैभव अधिक गतीमान करताहेत ही गोष्ट नक्‍कीच स्वागतार्ह आहे. पण हा विकास होताना याचे राजकीय साईड इफेक्‍टही तितकेच आहेत. शेवटी राजारामबापू कारखान्याचा मुख्य स्पर्धक म्हणूनही हुतात्माने सातत्याने चांगला दर देवून शेतकरी हा केंद्रबिंदू मानला.

त्यादृष्टीकोनातून अण्णांना मानणारा कार्यकर्ता हा जयंतरावांच्या राजकारणाचा सुरुवातीपासून विरोधकच राहिला आहे. त्यामुळे फडणवीस व चंद्रकांतदादा पाटील यांनी वैभव यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिली आहे .

नाईकवाडे यांनी ही ऑफर स्वीकारली नाही तरी    तरी त्यांना पाठबळ देण्याचे संकेत देण्यातून जयंत पाटील विरोधकांची मोट अधिक मजबूत करून विधानसभेलाही त्यांच्यासमोर मोठे आव्हान उभे करण्याचाची फडणवीसांची आणखी एक भविष्यकालीन चाल म्हणून पाहिले जाते.

जयंतरावांची कोंडी 

कॉंग्रेसलाही बराच प्रयत्न करून येथे जयंतरावांना नामोहरम कधीच करता आले नाही. ते करण्याचा   विडा  बिजेपीने उचलला असून त्यात यश येताना दिसतेय. 

गेल्या दोन महिन्यात जयंतरावांनी थेट पंतप्रधान मोदींवर टीका करून लक्ष वेधले होते. विधानसभेत त्यांनी मोदीविषयक अवमानजनक टीपणी केल्यानंतर गिरीष बापट यांनी त्याचा समचार कसा घेतला याची क्‍लिप सर्वत्र फिरत होती.

त्यानंतरही जयंतरावांनी मोदींना अनावृत्त पत्र लिहीले, खोट्या नोटा पाठवून भाजप विरोधात आक्रमक धोरण घेतले. तितक्‍याच आक्रमकतेने भाजपनेही त्यांचा कार्यक्रम करण्याची प्रत्येक संधी सोडलेली नाही. आता वैभव नायकवडींना रसद देवून वाळव्यातील आगामी 'क्रांती'ची चाहूलच दिली आहे. यातून एक मात्र झाले की बीजेपीची "जेजेपी'तून पूर्ण मुक्‍तता झाल्याचा मेसेजे गेला. 

संभाजी पवारांना अवतण... 

फडणवीसांनी खास अवतण देवून संभाजी पवारांना इस्लामपुरात भेटणं...याची चर्चा तर होणारच! एकीकडे उद्धव ठाकरे सांगलीत असताना संभाजी पवार यांच्या  कुटुंबीयांनी फडणवीसांची भेट घ्यावी, हे स्वच्छ संदेश देणारे मानले जातेय.

जिल्ह्यातील मूळ भाजप नेत्यांनी सन 2014 मध्ये घेतलेले काही नेते डोईजड झाले आहेत. अशावेळी जिल्ह्यात भाजप नंबर वन असला तरी सांगलीसारख्या ठिकाणी ' मास लिडर'ची महापालिकाक्षेत्रात जागा रिक्‍त वाटते आहे. त्यामुळे भविष्यात फडणवीस आणि पवार यांच्या चर्चेतील ' गुलदस्ता' नवा राजकीय रंग आणणार का, याकडे लक्ष असेल. तूर्त तरी मुख्यमंत्र्यांची चाल जयंतरावांच्या गोटात खळबळ उडवणारी ठरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com