हेवीवेट आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांना सीएमचा झटका

पिंपरी महापालिकेत भाजप सत्तेवर आलाखरा. मात्र तेथील कारभारावर विविध आरोप होत आहेत. सत्ताधारी हे महापालिकेचे नुकसान होईल, असे निर्णय घेत असल्याने त्या विरोधात मुख्यमंत्र्यांकडे दाद मागण्यात आली होती. आता या तक्रारींची चौकशीचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
हेवीवेट आमदार लक्ष्मण जगताप व महेश लांडगे यांना सीएमचा झटका

पिंपरी : पिपरी-चिंचवड महापालिकेतील गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे बुडत्याचा (पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजप)पाय आता आणखी खोलात गेला आहे. परिणामी आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांना मुख्यमंत्र्यांनी झटका दिल्याचे दिसून येत आहे.  

पालिकेत प्रथमच सत्तेत आलेला हा पक्ष दहा महिन्यांतच अडचणीत आला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याही अडचणी याव्दारे वाढल्या आहेत.कारण याप्रकरणात त्यांनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आलेले आहे. या दोन आमदारांच्या मतदारसंघातच मोठ्या प्रमाणात निधी खर्च होणार असल्याने ते दोघेही स्थायी समितीच्या अध्यक्षांचे समर्थन करत होते. विरोधकांनी त्यांच्यावर दुकानदारीची टीका केली होती. लक्ष्मण जगताप यांनीही या टिकेला आक्रमक प्रत्युत्तर दिले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनीच चौकशीचा आदेश दिल्याने सत्ताधारी भाजपवर नामुष्किची वेळ आली आहे.  

या सरकारी चौकशीमुळे याप्रश्नी पाठपुरावा करणारी शिवसेना व त्यांचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अर्धी लढाई जिंकली. मात्र, खरी लढाई पुढेच आहे. चौकशीचे नाटक करून संबंधितांना क्लिनचिट देण्यात आली,तर शिवसेनेचा हा संघर्ष वाया जाणार आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात दाद मागण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही, असाही धोका व्यक्त होत आहे. अर्थात या चौकशीच्या आदेशामुळे भाजपच्या नेत्यांना झटका बसला आहे.

नगरविकास विभागाचे प्रधान सचिव ही चौकशी करणार आहेत. उचित कार्यवाही करण्यास त्यांना सांगण्यात आले आहे. याबाबत शिवसेना व या पक्षाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मोठा आवाज उठविला होता.त्यानंतर राष्ट्रवादीनेही तोंडदेखला विरोध या कथित गैरव्यवहाराला केला होता

आढळराव हे नुसते आरोप करून थांबले नाहीत. त्यांनी याप्रकरणी प्रथम 17 जानेवारीला मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना पत्र दिले. त्यात त्यांनी पालिकेच्या सव्वाचारशे कोटी रुपयांच्या रस्ते कामांच्या निविदेत नव्वद कोटी रुपयांचे नुकसान पालिकेला होत असल्याने ती रद्द करून नव्याने काढण्याची मागणी केली होती. मात्र, 12 दिवसानंतरही त्याची दखल घेण्यात आली नाही.त्यामुळे नुकतेच (ता.29) त्यांनी पुन्हा मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र दिले.त्यात त्यांनी या गैरव्यवहाराला पाठीशी घालत असल्याबद्दल अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले होते. त्याचा नेमका परिणाम झाला आणि चौकशीचा आदेश निघाला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com