`मी पुन्हा येईन, पण विरोधी पक्षनेता म्हणून`

विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला प्रथम क्रमांकावर ठेवूनही आपले मुख्यमंत्रिपद टिकवू न शकणाऱ्या नेत्यांमध्ये फडवणीस यांचा समावेश होईल.
`मी पुन्हा येईन, पण विरोधी पक्षनेता म्हणून`

मुंबई : मी परत येईन" अशी घोषणा देत विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी गाजवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बहुमत नसल्याने सत्ता स्थापन करणार नाही, अशी प्रांजळ कबूली राज्यपालांकडे केली. फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून विधानसभेतील अखेरचे भाषण `मी पुन्हा येईन` या दाव्याने केले होते.

तसेच विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही त्यांनी मी पुन्हा येईनचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्याची सोशल मिडियात खिल्ली उडविण्यात आली होती. तरीही राज्यात प्रथम क्रमांंकाचा पक्ष म्हणून भाजपने स्थान पटकावले. सलग पाच वर्षे मुख्यमंत्री म्हणून पूर्ण करणारे फडणवीस हे राज्यातील दुसरेच नेते ठरले आहेत.

या आधी वसंतराव नाईक हे सलग बारा वर्षे मुख्यमंत्री होते. निवडणुकीनंतर दुसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्रिपद टिकविण्यात फार कमी नेते यशस्वी ठरले आहेत. विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊन मुख्यममंत्रिपद टिकविणाऱ्यात वसंतराव नाईक (दोनदा), वसंतदादा पाटील (एकदा), शरद पवार (एक वेळा), अशोक चव्हाण (एक वेळा) यांचा समावेश आहे. शंकरराव चव्हाण, अ. र. अंतुले, शिवाजीराव पाटील निलंगेकर,  मनोहर जोशी, विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री पदावर असताना विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले नाहीत. याउलट शरद पवार (1995), नारायण राणे (1999), सुशीलकुमार शिंदे (2004) आणि पृथ्वीराज चव्हाण (2014) हे आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले. पण त्यांना आपले पद टिकविता आले नाही. शिंदे यांनी तर काॅंग्रेसला विजय मिळवून देऊनही त्यांच्याऐवजी विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्रिपदी निवड झाली होती. 

शिवसेनेसोबतची चर्चा असफल झाल्यानंतर अल्पमतातील सरकार स्थापन करू नये यावर भाजपच्या कोअर कमिटीचा निर्णय झाला. वर्षा या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी काल सकाळी ही बैठक झाली. त्यानंतर सायंकाळी चार वाजता पुन्हा कोअर कमिटीची बैठक झाली. यावेळी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी बैठकीत दिल्लीवरून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन केले. बहुमताचे सर्व पर्याय फोल ठरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेचा नाद सोडून विरोधात बसावे यावर या बैठकीत एकमत झाले. यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे, आशिष शेलार हे सर्व नेते राजभवन वर गेले. राज्यपालांना त्यांनी सत्ता स्थापन करू शकत नसल्याचे पत्र दिले. सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले होते. मात्र भाजपने ते विनम्रपणे नाकारले.

यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. ते म्हणाले की, विधानसभा निवडणूकीत भाजप-शिवसेना महायुतीला जनतेनं स्पष्ट बहुमत दिले. पण शिवसेनेला भाजप सोबत सत्ता स्थापन करण्याची इच्छा नाही. शिवसेनेला कॉंग्रेस, राष्ट्रवादी व कॉग्रेस सोबत सत्ता स्थापन करायची असून त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. यापेक्षा अधिक बोलण्याचे पाटील यांनी टाळले.

मुख्यमंत्र्यांच्या या मी पुन्हा येईनच्या दाव्यावर पण विरोधी पक्षनेता म्हणून, अशी टिप्पणी सोशल मिडियात सुरू झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com