Fadanvis cornered Shivsena in Navi Mumbai through smart move | Sarkarnama

चौगुलेंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देऊ करून फडणवीसांनी एका दगडात दोन पक्षी मारले ? 

सुजित गायकवाड
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

चौगुलेंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देऊ करून फडणवीसांनी एका दगडात दोन पक्षी मारले अशी चर्चा आहे .

नवी मुंबई  : सोलापूर येथील वडार समाजाच्या मेळाव्यात नवी मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राज्यमंत्रिपदाचा दर्जा  ऑफर केल्याने नवी मुंबईतील राजकारण ढवळण्यास सुरुवात झाली आहे. 

सरकारचे निर्णय  समाजापर्यंत पोहोचावेत  यासाठी महाराष्ट्र समन्वय समिती स्थापन करून   विजय चौगुले यांना या  समितीचे अध्यक्ष केले जाईल आणि  त्यांना राज्यमंत्रीपद दिलं जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती . 
 
देवेंद्र फडणवीस यांची ही घोषणा समाजातील मतदारांना आकृष्ट करण्यासाठी होती असे मानले जाते . मात्र त्याबरोबरच देवेंद्र फडणवीसांनी विजय चौगुले यांच्यावरही जाळे टाकले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे . मुख्यमंत्र्यांच्या या नव्या खेळीमुळे नवी मुंबईत शिवसेनेत  खळबळ उडाली आहे . चौगुलेंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देऊ करून फडणवीसांनी एका दगडात दोन पक्षी मारले अशी चर्चा आहे . 

एकीकडे आठ लाख वडार समाजात भाजपविषयी आत्मीयतेची भावना निर्माण झाली असून दुसरीकडे नवी मुंबई  शिवसेनेत सुरुंग लावलण्याचे काम झाले आहे . या सुरुंगाचा बार लोकसभेपूर्वी उडणार का याबाबत उत्सुकता आहे . 

 चौगुलेंचा भाजपमध्ये काही अंशी चंचुप्रवेश झाल्याची चर्चा शहरात रंगली आहे. चौगुले यांचे   15 समर्थक नगरसेवक आहेत . चौगुले उद्या भाजमध्ये गेले तर हे पंधरा नगरसेवक  भाजपमध्ये जाणार अशा चारचा रंगू लागल्या आहेत .  

त्यामुळे विजय चौगुले यांच्याविषयी शिवसेनेत संशयाचे वातावरण निर्माण होऊ शकते . अविश्वासाचे वातावरण वाढले तर चौगुले यांना भाजप प्रवेशाशिवाय पर्याय राहणार नाही . तसे झाले तर  ऐन लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेला येथे मोठे खिंडार पडण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

इलठाणपाडा परिसरातून राजकारणाला सुरुवात केलेल्या चौगुले त्यांच्या आक्रमक स्वभावामुळे राज्यात प्रसिद्ध आहेत. चौगुले यांना डावलून पक्षश्रेष्ठींनी नवी मुंबईत वाटप केलेल्या पदांमुळे मागील अनेक महिन्यांपासून विजय चौगुले शिवसेनेत नाराज असल्याचे समजते.

स्वकियांकडूनच पाय खेचण्यात येत असल्याने चौगुले यांनी आठ लाखांच्या वडार समाजाला एकत्र करण्याचा झंझावात सुरू केला. त्याचा मेळावा सोलापुरात करताना देवेंद्र फडणवीस यांनी चौगुलेंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याची घोषणा करून शिवसेनेच्या गोटात हवा गरम केली आहे. शिवसेना नेते आता हा पेच कश्या पद्धतीने हाताळतात हे महत्वाचे ठरणार आहे . 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख