फडणवीस "सागर'मधे; भुजबळ सागरकिनारी "रामटेक'वर..! 

 फडणवीस "सागर'मधे; भुजबळ सागरकिनारी "रामटेक'वर..! 

मुंबई : मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर घराच्या शोधात असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना सरकारने "सागर' बंगला दिला आहे.

विधानसभेत बोलताना, "मेरा पाणी उतरता देखकर किनारे पर घर मत बसा लेना, मै समंदर हू लौटकर वापस आऊंगा..' असा शेर ऐकविणाऱ्या फडणवीस यांना सरकारने उदार मनाने "सागर' हा बंगला दिला आहे. " 

रामटेक' शी अतूट नाते असलेल्या छगन भुजबळ यांना पुन्हा "रामटेक' बंगला मिळाल्याने भुजबळ आता, "मी परत आलो..मी परत आलो..' या खुशीने गृहप्रवेश करणार आहेत. समुद्राचा विस्तीर्ण किनारा व हिरव्यागर्द हिरवळीने "रामटेक'चा परिसर नटला आहे. मंत्र्याच्या बंगल्यांचा "राजा' म्हणून रामटेककडे पाहिले जाते.

बंगला आणि राजकारणी नेत्यांचे नाते पुन्हा एकदा समोर आले ते जयंत पाटील यांना मिळालेल्या "सेवासदन' मुळे. याच "सेवासदन' मध्ये जयंतरावाचे वडील राजाराम बापू पाटील यांनीही काही काळ मंत्री म्हणून वास्तव्य केले आहे. त्यामुळे जयंत पाटील यांच्यासाठी या बंगल्याचे महत्त्व मोठे असल्याचे सांगण्यात येते.

अलिशान व निसर्गसौंदर्याने नटलेला अन हेरिटेजचे रूप धारण करणारा "रॉयलस्टोन' येथे आता शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे वास्तव्य राहणार आहे. कॉंग्रेसच्या नेत्यांना मात्र आज बंगल्याचे वाटप झाले नाही. हे नेते दिल्लीतून परत आल्यानंतर वाटप होईल.

पण बाळासाहेब थोरात यांचा आवडता "सेवासदन' बंगला मात्र त्याअगोदरच जयंत पाटल यांनी पटकवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना परंपरेने "वर्षा' निवासस्थान मिळाले असले तरी त्यांच्या "मातोश्री' बंगल्यातून ते येथे वास्तव्यास येतील काय असा सवाल केला जात आहे. 

"शब्द खरा केला' 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मलबार हिलवरील "सागर' बंगला आज देण्यात आला. विरोधी पक्षनेत्याला असा अलिशान बंगला मिळण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने "मी मुख्यमंत्री झालो तरी सुडाने वागणार नाही.' हा शब्द उद्धव ठाकरे यांनी खरा करून दाखविल्याची चर्चा सुरू आहे. स्वत: फडणवीस यांनी मलबार हिलवरील या बंगल्यासाठी आग्रह धरला होता. तो उदारमनाने देण्यात आला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com