ex mp raju shetti assures pune citizens about vegetables   | Sarkarnama

पुण्यात घरपोच भाजीपाला देवू: राजू शेट्टी

संपत मोरे
बुधवार, 25 मार्च 2020

त्या त्या सोसायटीतील तरुणांनी घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाला लागणारा भाजीपाल्याची माहिती घ्यावी. ती लिस्ट त्यांनी आम्हाला पाठवावी. आम्ही त्या सोसायटीत त्यांना तेवढा भाजीपाला रास्त दरात पोहोच करू.

पुणे: "पुण्यातील नागरिकांना रास्त दरात भाजीपाला देण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते करतील. पुण्यातील तरुण मंडळांनी आमच्याशी संपर्क साधावा," असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे.

कोरोना व्हायरसमुळे लोकांना घराच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे. संचारबंदी असल्यानेही लोक बाहेर पडत नाहीत. पोलिसांच्या भीतीमुळे लोक घरात बसून आहेत. काही ठिकाणी पोलीस आणि नागरिक यांच्यात वादावादी होत आहे. लोक घरातून बाहेर पडत नसल्याने  भाजीपाला मिळणे कठीण बनले आहे. अशावेळी माजी खासदार राजू शेट्टी पुणेकरांच्या मदतीला धावले आहेत. त्यांनी 'आमच्याशी संपर्क करा. आम्ही भाजीपाला घरपोच देण्याचा प्रयत्न करू "असे सांगितले आहे. मात्र त्यासाठी त्या त्या प्रभागातील युवक मंडळे आणि तरुण मंडळे यांनी सक्रिय झाले पाहिजे,'' असेही शेट्टी म्हणाले.

"त्या त्या सोसायटीतील तरुणांनी घरोघरी जाऊन प्रत्येक कुटुंबाला लागणारा भाजीपाल्याची माहिती घ्यावी. ती लिस्ट त्यांनी आम्हाला पाठवावी. आम्ही त्या सोसायटीत त्यांना तेवढा भाजीपाला रास्त दरात पोहोच करू. तो भाजीपाला ते तरुण त्या कुटुंबाना देतील. यात तरुणांनी जर लक्ष घातले तर सामान्य लोकांची ससेहोलपट होणार नाही."असे शेट्टी यांनी सांगितले.

"जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लोकांना मदत केली आहे.आमची नेहमीच मदतीची भूमिका आहे. आता आम्ही शहरातील लोकांना भाजीपाला पोहोच करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोरोनासारख्या संकटाला न घाबरता आपण एकमेकांना मदत करून यावर मात करूया."असे शेट्टी म्हणाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख