विजयोत्सव टाळून हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी काढली होती शेती पाण्यासाठी यात्रा...! 

देशाच्या तत्कालीन पंतप्रधान कै. इंदिरा गांधी ह्या हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या आमदारकीच्या प्रचारासाठी फलटणमधे आल्या होत्या.
hundurao_nimbalkar
hundurao_nimbalkar

फलटण शहर : 1996 मध्ये हिंदूराव नाईक निंबाळकर यांना शिवसेनेने सातारा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. ते शिवसेनेचे सातारा जिल्ह्यातील पहिले खासदार झाले.

निवडून आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा विजयोत्सव साजरा न करता दुष्काळी भागातील शेती आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांसमावेत शिंगणापूर ते उरमोडी अशी पदयात्रा काढली. 

ही पदयात्रेतील गर्दी पाहून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पदयात्रेला सामोरे जाऊन दुष्काळी भागाचा पाण्याचा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले होते. 

फलटण तालुक्‍याच्या सामाजिक, राजकिय, शैक्षणिक, व औद्योगिक क्षेत्रातील प्रतिकूल परिस्थितीला आपल्या अंगभूत गुणांद्वारे बोलायला लावणारे विविधस्पर्शी व्यक्तिमत्व माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या संघर्षामय जीवनाची आज अखेर झाली.

दुष्काळी भागातील एक लढवैय्या योद्धा काळाच्या पडद्याआड गेल्याची खंत फलटण तालुक्‍यासह सर्व जिल्ह्यातील जनता व्यक्त करत आहे. 

हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा जन्म 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला. त्यांच्या मातोश्री डाव्या चळवळीच्या विचारसरणीच्या होत्या. त्यांनी प्रतिसरकारच्या कालावधीत क्रांतिकारकांना बळ देण्याचे काम केले होते. एवढीच त्यांची पार्श्वभूमी होती.

वयाच्या 23 व्या वर्षी हिंदुराव नाईक निंबाळकर भारतीय लष्करात दाखल झाले. काही वर्षाच्या देशसेवेनंतर फलटण येथे येऊन त्यांनी आपल्या जुन्या सवंगड्यांसमवेत फलटण शहर विकास आघाडी स्थापन केली. 

या आघाडीचे तत्कालीन नगराध्यक्ष स. रा. (बापू) भोसले यांची प्रमुख म्हणून निवड केली. त्या काळातील फलटण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बापू भोसले यांना निवडून आणण्याची किमया त्यांनी करुन दाखवली.

1991-92 मध्ये त्यांचे फलटण शहराच्या राजकारणात आगमन झाले. त्यानंतर ते नगरपालिकचे नगराध्यक्ष झाले. तर त्यावेळी निंबाळकर उपनगराध्यक्ष होते. तेव्हापासुन फलटण शहर व तालुक्‍यात त्यांचा राजकिय दबदबा निर्माण झाला होता. 

1996 मधे त्यांना शिवसेनेने सातारा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. ते शिवसेनेचे सातारा जिल्ह्यातील पहिले खासदार झाले.

निवडून आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा विजयोत्सव साजरा न करता दुष्काळी भागातील शेती आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांसमावेत त्यांनी शिंगणापूर ते उरमोडी (परळी, ता. सातारा) अशी पदयात्रा काढली. 

या पदयात्रेला सामोरे जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पाण्याचा प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले होते. त्यानंतर कृष्णाखोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. त्या महामंडळाचे ते उपाध्यक्ष झाले. त्यावेळी पश्‍चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा एकमेव खासदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. 

संसदेच्या सभाग्रहात लोणंद फलटण बारामती रेल्वे मार्ग प्रश्न प्रभावीपणे मांडून त्यावर आर्थिक तरतूद करायला भाग पाडले. परिणामी त्यांनी पाहिलेले रेल्वेचे स्वप्न काही महिन्यापूर्वी याची देही याची डोळा अनुभवला. 

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 50 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात आक्रमक भाषण केले होते. देशात बालिया (उत्तरप्रदेश) आणि सातारा हे दोन जिल्हे क्रांतिकारक जिल्हे म्हणून ओळख आहे. यापैकी सातारा जिल्ह्यातील खासदार म्हणून निवडून आलो असल्याचे निदर्शनास आणून देताच माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी त्यांना आलिंगन दिले होते. 

कै.प्रेमलाताई चव्हाण व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराण्याशी हिंदूराव निंबाळकर यांचे निकटचे संबंध आहेत.त्यांनी कॉंग्रेसमधे प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात उल्लेखनीय काम केले. देशाच्या तत्कालीन पंतप्रधान कै. इंदिरा गांधी ह्या हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या आमदारकीच्या प्रचारासाठी फलटणमधे आल्या होत्या. 

10 महिन्यापूर्वी झालेल्या माढा लोकसभा मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यात हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे महत्वपूर्ण योगदान होते.

त्यांचे दुसरे चिरंजीव समशेर बहाद्दर हे नगरपालिकेत विरोधिपक्षनेते म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांच्या स्नुषा सौ. जिजामाला नाईक निंबाळकर ह्या सातारा जिल्हा परिषद सदस्या आहेत. अशी एकुण त्यांच्या घराण्याची राजकीय स्थिती आहे. 

वाचन मनन चिंतन व्यासंग या गुणांची सोबत करत आक्रमक परखड धाडसी निर्णय सुचकता अन्याय अत्याचाराविरुध्द लढणारा परिणामाची तमा न बाळगणारा नेता म्हणून हिंदुराव नाईक निंबाळकर यांचास्थायी स्वभाव अखेर पर्यंत बनला होता. एकुणच सामजिक राजकीय परिवर्तनाच्या दिशेने पाउल टाकणारं एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com