माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे निधन

नगर तालुक्‍यात सुमारे 30 माध्यमिक विद्यालये स्थापन करून त्यांनी स्थानिक संस्थांकडे सुपूर्द केली. हीच महाविद्यालये स्वतःच्या संस्थेमार्फत सुरू केली असती, तर दादा पाटील तालुक्‍याचे शिक्षणसम्राट झाले असते; परंतु त्यांनी शिक्षणाचा 'धंदा' केला नाही.
माजी खासदार दादा पाटील शेळके यांचे निधन

नगर : जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार व खासदार मारुती देवराम तथा दादा पाटील शेळके (वय 79) यांचे आज  रात्री 10 वाजता  अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (शनिवारी) दुपारी तीन वाजता खारेकर्जुने (ता. नगर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शेळके यांच्यामागे पत्नी, जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक असलेले पुत्र रावसाहेब व तीन मुली, असा परिवार आहे. रक्तातील साखर वाढल्याने शेळके यांना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस त्यांच्यावर पुण्यातही उपचार करण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आले होते. औषधोपचार सुरू असतानाच आज रात्री 10 वाजताच्या सुमारास शेळके यांची प्राणज्योत मालवली.

दादा पाटील चार वेळा आमदार व दोनदा खासदार होऊनही त्यांची साधी राहणी जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात कौतुकाचा विषय होता. त्यांच्या वागणुकीत कोणताही डामडौल कधीच नव्हता. वयाच्या 21 व्या वर्षीच दादा पाटलांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. 1962 पासून 1978 पर्यंत सलग ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. नगर तालुका पंचायत समितीचे सभापती व उपसभापती ही पदेही त्यांनी भूषविली. सन 1978 पासून 1994 पर्यंत ते सलग विधानसभेवर निवडून गेले. पुढे 1994 व 1996 अशा दोन वेळा ते खासदारही झाले.

दादा पाटलांनी नगर तालुक्‍यातील वाळकी येथे सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. अवघ्या आठ महिन्यांत कारखाना उभा करून त्यांनी 2001 मध्ये पहिला गळीत हंगाम सुरू केला होता. शेती व उसाच्या प्रश्‍नाबाबतचा त्यांचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे. नगर तालुक्‍यात सुमारे 30 माध्यमिक विद्यालये स्थापन करून स्थानिक संस्थांकडे सुपूर्द केली. हीच महाविद्यालये स्वतःच्या संस्थेमार्फत सुरू केली असती, तर दादा पाटील तालुक्‍याचे शिक्षणसम्राट झाले असते; परंतु त्यांनी शिक्षणाचा "धंदा' केला नाही.

दादा पाटील शेळके यांचा जीवनपट

  •  जन्म : 2 ऑगस्ट 1941
  •  गाव : खारेकर्जुने (ता. नगर)
  •  शिक्षण : एस.एस.सी.
  •  चार वेळा आमदार (1978 ते 94)
  •  दोनदा खासदार (1994 व 1996)

भूषविलेली पदे

  • सदस्य, जिल्हा परिषद (1962-78)
  • उपसभापती, पंचायत समिती, नगर (1962-64)
  • सभापती, पंचायत समिती, नगर (1966-67)
  • अध्यक्ष, जिल्हा सहकारी बॅंक (1991)
  • सदस्य, रोजगार हमी योजना समिती, महाराष्ट्र
  • अध्यक्ष, नगर तालुका देखरेख संघ
  • अध्यक्ष, नगर तालुका सहकारी दूध संघ
  • सदस्य, उत्तर विभागीय सल्लागार समिती, रयत शिक्षण संस्था
  • अध्यक्ष, नगर तालुका सहकारी साखर कारखाना

स्थापन केलेल्या संस्था

  • लोकहितवादी शिक्षण संस्था
  • नगर तालुका सहकारी साखर कारखाना
  • नगर तालुका सहकारी दूध संघ
  • नगर तालुका सहकारी दूध उत्पादक पतसंस्था
  • सीना वाहतूक सहकारी संस्था 
  • खारे कर्जुने विविध सहकारी संस्था

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com