Ex MLA Vaijinathrao Akat passes away | Sarkarnama

माजी आमदार वैजनाथराव आकात यांचे निधन

सरकारनामा
बुधवार, 25 जुलै 2018

वैजनाथराव आकात हे परतूर विधानसभा मतदारसंघात 1985 ते 1995 या काळात आमदार राहिले होते.

परतूर (जि. जालना)  : माजी आमदार वैजनाथराव यादवराव आकात (वय 89) यांचे बुधवारी  दुपारी सव्वाबाराला जालन्यात एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी (ता. 26) सकाळी दहाला परतूरच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वैजनाथराव आकात हे परतूर विधानसभा मतदारसंघात 1985 ते 1995 या काळात आमदार राहिले होते. सर्वप्रथम 1985 मध्ये शरद पवार यांच्या पुरोगामी लोकशाही आघाडीतून ते 1985 ला आमदार झाले. पुढे कॉंग्रेसमधून 1990 ला ते पुन्हा विधानसभा सदस्य झाले. सातोनाच्या विविध कार्यकारी सेवासंस्थेचे अध्यक्ष ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला.

परतूरचा बागेश्वरी साखर कारखाना, परतूर पीपल्स बॅंकेच्या माध्यमातून सहकाराचे, तर मराठवाडा सर्वोदय शिक्षणप्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक चळवळीला चालना दिली. पंचायत समिती सभापती, बाजार समिती सभापती अशा अनेक पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा महेश आकात, तीन मुली, पुतणे, स्नुषा, नातवंडे असा परिसर आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

संबंधित लेख