चार महिने झाले तरी गणपतराव देशमुखांना पेन्शन मिळेना!

....
ganpatrao deshmukh
ganpatrao deshmukh

सोलापूर : मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या अथवा माघार घेतलेल्या माजी आमदारांना मागील चार महिन्यांपासून ठाकरे सरकारच्या काळात पेन्शन मिळालेली नाही. राज्याच्या राजकारणात तब्बल 51 वर्षे आमदारकी उपभोगलेले ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख मागील चार महिन्यांपासून पेन्शनच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्य सरकारने यंदा तीन लाख 14 हजार कोटींच्या महसुली उत्पन्नाचे उद्दिष्टे ठेवले, परंतु जानेवारीपर्यंत दोन लाख 14 हजार कोटींचा महसूल जमा झाला. महसुली तुटीमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असून मागच्या वर्षी राज्य सरकारने 30 हजार कोटींचे कर्जही काढले आहे.

त्यातच राज्यातील सुमारे आठशे माजी आमदारांना दरवर्षी तिजोरीतून 65 कोटींपर्यंत पेन्शन द्यावी लागते. पहिल्या पाच वर्षांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांची पेन्शन दिली जाते. त्यानंतरच्या प्रत्येक वर्षांसाठी दोन हजारांची वाढ करुन एकत्रित पेन्शन देण्याचा नियम करण्यात आला आहे. त्यानुसार ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांना दरमहा एक लाख 42 हजारांची पेन्शन मिळणे अपेक्षित आहे. मात्र, मागील चार महिन्यांपासून एक दमडाही मिळाला नसल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.

माहिती संकलित नसल्याचे वित्त विभागाचे उत्तर
2019 च्या विधानसभेत पराभूत झालेल्या आमदारांची आणि या निवडणुकीतून माघार घेतलेल्या माजी आमदारांची माहिती संकलनाचे काम सुरु असल्याचे वित्त विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. चार महिने झाले, परंतु अद्याप माहिती संकलन झालेले नाही. दरम्यान, राज्याच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याने नव्याने माजी झालेल्या आमदारांच्या पेन्शनचा विषय लांबणीवर पडल्याचेही वित्त विभागातील सूत्रांनी सांगितले. आता एप्रिलनंतर नव्या माजी आमदारांना पेन्शन मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

मागील विधानसभा निवडणुकीतून मी माघार घेतली. 51 वर्षे आमदार म्हणून जनतेची सेवा केली. विधानसभेची निवडणूक होऊन चार महिने झाले, परंतु अद्याप पेन्शन सुरु झालेली नाही. राज्याच्या महाविकास आघाडीकडून पेन्शन लवकर मिळेल, असा विश्‍वास आहे, असा आशावाद देशमुख यांनी व्यक्त केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com