माजी आमदार बळीराम सिरस्करांना एका महिन्याचा कारावास

...
माजी आमदार बळीराम सिरस्करांना एका महिन्याचा कारावास

अकोला : बाळापूर विधानसभा मतदारसंघात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भारिप बमंसच्या वतीने अपक्ष उमेदवार असलेले माजी आमदार बळीराम भगवंत सिरस्कार यांच्या प्रचारासाठी बॅनर लावण्यात आले होते.

 प्रचार संपल्यानंतरही प्रचाराचे बॅनर तसेच असल्याने निवडणूक निरीक्षकांच्या तक्रारीनंतर माजी आमदार बळीराम सिरस्कार यांच्यासह अन्य चौघांवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपिकरणाचा गुन्हा दाखल केला होता. 

याप्रकरणाची सुनावणी बुधावारी (ता.6) बाळापूर न्यायालयात झाली असून, न्यायालयाने बळीराम सिरस्कार यांच्यासह चौघांना एका महिन्यांचा कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयीन सुत्रानुसार, बाळापूर विधानसभा मतदारसंघातील 2014 चे विजयी उमेदवार म्हणून भारिप-बमंसच्या वतीने बळीराम सिरस्कार यांनी निवडणूक लढविली होती. त्यांच्या प्रचारासाठी फलक, बॅनर, पोस्टरही लावण्यात आले होते. 

ता.9 नोव्हेंबर 2014 रोजी प्रचार संपल्यानंतरही निवडणूक निरीक्षक संदेश कीर्तिक यांना 10 नोव्हेंबर 2014 रोजी सकाळी 10 वाजता गस्त घालत असताना बसस्थानकासमोर असलेल्या विजेच्या खांबावर बळीराम सिरस्कार यांच्या प्रचाराचे फलक दिसून आले. 

याप्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करून पोलिसांनी माजी आमदार बळीराम सिरस्कार, गावंडगाव येथील रहिवासी चरणकुमार उर्फ चरणसिंग चव्हाण, मोरगाव सादीजन येथील भारत निखाडे, नवथळ येथील सुरेंद्र तेलगोटे यांच्याविरुद्ध सार्वजनिक संपत्ती विद्रुपीकरण प्रतिबंधक कलम तीन अन्वये गुन्हा दाखल करून पंचासमक्ष बॅनर जप्त करण्यात आले होते.

 पोलिसांनी याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षाकडून सहा साक्षीदारांच्या साक्ष नोंदविल्या गेल्या. दोन्ही पक्षाचा युक्तीवाद एेकून न्यायाधीशांनी माजी आमदारासह चार जणांना एक महिन्यांचा कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास दोषींना अतिरिक्त दहा दिवसांची शिक्षा भोगण्याचे आदेश दिले आहे. सरकारी पक्षाकडून ऍड . विजय पंचोली, ऍड . संध्या इंगोले यांनी बाजू मांडली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com