माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील यांचे निधन

स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेले व स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणात येवून कॅबिनेट मंत्री राहिलेले माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील (वय १००) यांचे आज पहाटे संगमनेर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुले, एक मुलगी असा परिवार आहे. संगमनेर येथे त्यांचा मुलगा डाॅ. राजेंद्र खताळ यांच्याकडे ते राहत होते. अरुण, प्रकाश, संजय, डाॅ. राजेंद्र व प्रमिला पाटील (धुळे) ही त्यांची मुले होत.
BJ Khatal Patil
BJ Khatal Patil

नगर : स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतलेले व स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणात येवून कॅबिनेट मंत्री राहिलेले माजी मंत्री बी. जे. खताळ पाटील (वय १००) यांचे आज पहाटे संगमनेर येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पाच मुले, एक मुलगी असा परिवार आहे. संगमनेर येथे त्यांचा मुलगा डाॅ. राजेंद्र खताळ यांच्याकडे ते राहत होते. अरुण, प्रकाश, सतीश, संजय, डाॅ. राजेंद्र व  प्रमिला पाटील (धुळे) ही त्यांची मुले होत. 
 
खताळ पाटील यांचा जन्म २६ मार्च १९१९ रोजी झाला. प्राथमिक शिक्षण धांदरफळ, माध्यमिक व पदवीपर्यंतचे शिक्षण संगमनेर येथे तर कायद्याचे शिक्षण पुण्यात झाले. लहानपणापासनच समाजसेवेची आवड असल्याने स्वातंत्र्यपूर्व काळात युवावस्थेत त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्यसैनिकांना मदत केली. विडी कामगारांच्या चळवळीत सहभाग घेऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. वकिली करताना सर्वसामान्यांसाठी ते झटत. नगरबरोबरच औरंगाबाद, सोलापूर, वैजापूर, पुणे न्यायालयात त्यांनी वकिली केली. प्रथमवर्ग दंडाधिकारी म्हणूनही धुळे येथे काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. 

१९५२ मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने संगमनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी पहिली निवडणूक लढविली. या निवडणुकीत दत्ता देशमुख यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर १९६२ मध्ये काँग्रेसकडून त्यांना विधानसभेची पुन्हा संधी  मिळाली. त्यात ते विजयी झाले. त्यानंतर तीन वेळा ते आमदार राहिले. अत्यंत अभ्यासू, सडेतोड वकृत्त्व असलेला नेता म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात खताळ पाटील प्रसिद्ध होते. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण आदी दिग्गज नेत्यांसोबत त्यांनी काम केले. 

अठरा वर्षाच्या मंत्रीपदाच्या काळात त्यांनी पाटबंधारे, सहकार, अन्न व नागरी पुरवठा, महसूल, कृषी, विधी व न्याय, कृषी नियोजन व परिवहन, पाटबंधारे, सिंचन क्षेत्र आदी विविध महत्त्वाच्या खात्यांवर काम केले. संगमनेर तालुक्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले. संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याचे ते मुख्य प्रवर्तक होते. १९६९ प्रत्यक्ष कारखाना सुरू झाला त्या वेळी त्यांच्यासोबत दत्ता देशमुख, भाऊसाहेब थोरात, भास्करराव दुर्वे आदी मंडळी होती. संगमनेर नगरपालिका कामगार संघटना, जिल्हा विकास मंडळ, विडी कामगार संघटना आदी संघटनांवर त्यांनी विविध पदांवर काम केले. कोल्हापूरचे दूधगंगा-वेदगंगा, सांगलीचे चांदोली-नांदोली, साताऱ्याचे धोम, पुण्याचे चासकमान, वर्ध्याचे अप्पर वर्धा, नांदेडचे विष्णुपुरीही ही धरणे खताल पाटील यांच्याच काळात झाली. 

वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून मुक्त होत स्वयंप्रेरणेने प्राणायाम, विपश्चना, चिंतन, मनन यात स्वतःला गुंतवून घेतले. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी लिखाणाला सुरूवात केली .त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली. अंतरीचे धावे, गुलामगिरी, धिंड लोकशाहीची, गांधीजी असते तर, लष्करी विळख्यातील पाकिस्तान, माझे शिक्षक ही पुस्तके त्यांची विशेष गाजली. वाळ्याची शाळा हे पुस्तक त्यांचे शेवटचे राहिले. देशातील सर्वात वयोवृद्ध लेखक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com