माजी सनदी आधिकारी चंद्रकांत दळवी कॉसमॉस बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवार 

 माजी सनदी आधिकारी चंद्रकांत दळवी कॉसमॉस बॅंकेच्या निवडणुकीत उमेदवार 


पुणे : राज्यातील सहकारी बॅंकींगमधील मोठ्या आणि महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या कॉंसमॉस सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या पंचावार्षिक निवडणुकीत माजी सनदी आधिकारी चंद्रकांत दळवी यांनी उडी घेतली आहे. सहकार आयुक्त म्हणून काम केलेल्या दळवी यांच्या उमेदवारीमुळे सहकार पॅनेलला बळ मिळाले असून ही निवडणूकदेखील चर्चेची झाली आहे. 

तब्बल 61 हजार सभासद, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगण, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश व तामिळनाडू सात राज्यात 140 शाखा व 14 हजार 650 कोटी रूपयांच्या ठेवी असलेली राज्यातील एक प्रमुख सहकारी बॅंक म्हणून बॅंकेचा लौकिक आहे. यावेळची निवडणूक अटीतटीची होईल, असे सांगण्यात येत आहे. सहकार पॅनेलमध्ये आधीच्या संचालक मंडळातील बहुसंख्य संचालक आहेत. दळवी यांच्यासारखा प्रशासनातील अनुभवी व स्वच्छ प्रतिमेचा माजी सनदी आधिकारी या पॅनेलला मिळाल्याने या पॅनेलची ताकद वाढली आहे. 

के. के. गोयल सहकार पॅनेलचे तर मुकुंद अभ्यंकर उत्कर्ष पॅनेलचे नेतृत्व करीत आहेत. दळवी यांच्या उमेदवारीमुळे बॅंकेला एक चांगला तज्ञ संचालक मिळेल. बॅंकेच्या वाटचालीला दळवी यांच्या प्रशासनातील अनुभवाचा उपयोग होईल, असे गोयल यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. दळवी यांनी मंत्रालयापासून राज्यात अनेक ठिकाणी काम केले आहे. पुणे विभागीय आयुक्त, सहकार आयुक्त. पुण्याचे जिल्हाधिकारी, राज्याचे जमाबंदी आयुक्त व भूमि अभिलेख संचालक अशा महत्वाच्या पदावर त्यांनी चांगले काम केले आहे. 

कार्यालयीन कामातील उरक वाढविणाऱ्या "झिरो पेंडन्सी' या उपक्रमाची सुरवात दळवी यांनी केली. त्यांच्या या कामाची दखल राज्य तसेच केंद्र सरकारने घेतली होती. दळवी यांच्या रूपाने प्रशासनातील कुशल, प्रामाणिक व पारदर्शीपणे काम करणारा माजी सनदी आधिकारी सहकारी बॅंकिंगमध्ये येण्याची ही पहिलीच वेळ असावी. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com