Even though i was in opposition , Gopinath Munde helped me in co operative elections | Sarkarnama

विरोधात निवडणुक लढवूनही मुंडे साहेबांनी दोन संस्था बिनविरोध दिल्या

रमेश आडसकर, भाजपा नेते, अध्यक्ष : अंबा सहकारी साखर कारखाना 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

२००९ साली प्रथमच दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे लोकसभा निवडणुक रिंगणात उरतले. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून रमेश आडसकर उमेदवार होते. मुंडेंनी मोठ्या फरकाने विजय मिळविला. तर, पराभूत उमेदवारांत सर्वाधिक मते घेण्याचा विक्रमही आडसकरांनी केला होता. दरम्यान, यानंतर काहीच महिन्यांनी झालेल्या अंबा सहकारी साखर कारखाना आणि केज बाजार समिती या दोन महत्वाच्या संस्था दिवंगत मुंडेंनी आडसकरांना बिनविरोध दिल्या होत्या. 

बीड : मी प्रथमच जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून २००२ साली राजकारणात प्रवेश केला. पहिल्याच निवडणुकीत स्वत:सह चार समर्थक विजयी झाले. जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्याइतके संख्याबळ नव्हते. राज्यातले मुंडे साहेबांचे राजकीय वजन पाहता  जिल्ह्यातली ही सर्वात मोठी संस्था ताब्यात असणे आवश्यक होते. एवढे मोठे नेते पण थेट  तात्यांना (दिवंगत लोकनेते बाबूराव आडसकर) भेटायला थेट आडसला आमच्या घरी आले.

तसे, त्यांचे आणि तात्यांचे सुरुवातीपासून ऋणानुबंध होते. राजकीय विचारसणी वेगळी असली तरी त्यांच्यातील संबंधता कधी दुरावा नव्हता. अगदी दोघे एकमेकांच्या विरोधात लढत असतानाही प्रचारात आणि मतदानाच्या दिवशी एकत्र बसून चहापान करत असत.

१९९५ साली रेणापूर मतदार संघातून या दोघांमध्ये लढत झाली होती. मतदान  संपल्यानंतर दोघांची वैद्यनाथ मंदिर परिसरात भेट झाल्यानंतर दोघांनी सोबत बसून  चहापान आणि अगदी निकालाच्या अंदाजावरही चर्चा केली होती. दरम्यान, दिवंगत  गोपीनाथराव मुंडेंच्या राजकारणाच्या सुरुवातीला तात्यांनी त्यांना ताकदीने मदत केलेली होती. म्हणूनच त्यांच्यातील संबंध कायम चांगले राहीले.

दरम्यान, घरी आल्यानंतर  तात्यांनी त्यांचे आदराने स्वागत केले. ‘मुंडे साहेब बोला’ कशी काय वाट चुकलात?असा  प्रश्न तात्यांनी मुंडेंना केला. त्यावर स्पष्टवक्ते असलेल्या मुंडेंनीही ‘ताकाला जाऊन मोरवा लपवायची सवय नाही’ असे उत्तर देत जिल्हा परिषद ताब्यात घ्यायला तुमची मदत  पाहीजे असा प्रस्ताव दिला.

अण्णांना (गोपीनाथराव मुंडेंचे जेष्ठ बंधू दिवंगत पंडितअण्णा मुंडे) अध्यक्ष करायचेय आणि रमेशलाही सन्मानाचे पद देऊ शब्द दिला. राष्ट्रवादीला साथ दिलीत तर, त्यांच्याच पदांच्या वाटण्यासाठी भांडणे सुरु आहेत, रमेशच्या काय, वाट्याला येणार असे गणितही मुंडे साहेब समजून सांगत होते.

तात्यांनी एकाच शब्दात ठिक आहे असा विश्वास दिला. दोघांचा एकमेकांच्या शब्दावर पक्का विश्वास होता. त्यामुळे कोणते पद देणार आणि देऊ यावर फारशी चर्चा झाली नाही. त्यानंतर अण्णा अध्यक्ष आणि मी उपाध्यक्ष झालो. बांधकाम सभापतीपदही  मुंडे साहेबांनी मला दिले  .

 दरम्यान, यामुळे वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आडसकर - मुंडे घराणे जवळ आले होते. त्यानंतर २००४ ची विधानसभा निवडणुक लागली. चौसाळा मतदार संघातून मला भाजपची उमेदवारी असावी असा समर्थकांचा मतप्रवाह होता. कारण, या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने यावेळीही राष्ट्रवादीकडून जयदत्त क्षीरसागरच उमेदवार असणार होते. त्यामुळे मला उमेदवारी मागण्यासाठी शिष्टमंडळ परळीला गेले. 

आम्ही रात्री दहा वाजता परळीच्या यशश्री निवासस्थानी पोचलो होतो. मुंडे साहेब पहाटे साडेपाच वाजता घरी पोचले. रात्रभर ते मतदार संघात फिरत होते. कारण, त्याच दिवशी मुंबईला बैठकीसाठी त्यांना जायचे होते. त्यानंतर पुन्हा राज्यात इतर ठिकाणी त्यांच्या सभा असल्याने त्यांनी रात्रीतच मतदार संघातील बहुतांशी भाग पिंजून काढला होता. घरी पोचताच ‘आडसकरांना बोलवा’ असा निरोप त्यांनी सोबतच्यांना दिला. माझ्यासह काही निवडक समर्थक गेलो. 

‘मला माहित आहे, तुम्ही चौसाळ्यातून रमेशला उमेदवारी मागायला आलेला आहात’, पण केशवराव आंधळेंना उमेदवारीसाठी मुकादम  संघटनेचा आग्रह आहे, रमेश तरुण आहे, त्याला आणखी भरपूर संधी आहे, योग्य वेळी त्याला योग्य संधी देऊ, असे आम्हाला त्यांनी सांगीतले. जिल्ह्यात राजकारण करण्यासाठी मुकादम संघटनेचा आग्रहास्तव आंधळेंना उमेदवारी द्यावी लागणार हे मला कळत होते. त्यामुळे थोडा वेळासाठी  नाराज झालो असलो तरी राजकारणात मुंडे साहेबांनी मिळविलेले मोठेपण सहज नव्हते हे त्यादिवशी माझ्या लक्षात आले.

कारण, आदल्या दिवशी ते राज्यातील इतर भागातून दौरा  करुन आले होते. रात्रभर परळी तालुक्यात फिरले आणि आमच्या भेटीनंतर ते मुंबईकडे  रवाना झाले होते. राजकारणात या व्यक्तीला किती संघर्ष आणि मेहनत करावी लागते हे याचाच विचार मनात घोळत होता.

 पुन्हा २००९ साली लोकसभा निवडणुकीत गोपीनाथराव मुंडे प्रथमच लोकसभेला भाजपचे उमेदवार होते. राज्यात राष्ट्रवादी - काँग्रेसची सत्ता होती. मुंडेंच्या विरोधात उमेदवार कोण यावर राष्ट्रवादीत चर्चा होत होती. मंत्री असलेल्या जयदत्त क्षीरसागर यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, त्यांनी नकार दिल्याने पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी रमेश तु निवडणुक लढव’ असे सांगीतले.

आडसकरांची जिल्हाभर असलेली ओळख, तरुण चेहरा म्हणून मी तगडा उमेदवार असेल असा पवारांचा अंदाज होता. मीही साहेब तुम्ही म्हणत असाल तर लढतो म्हणून निघालो आणि कामाला लागलो. एक लाख ४० हजार मतांनी ते विजयी झाले. काही अपवाद वगळता बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीतले अनेक बडे नेते फोडण्यात मुंडेंना यश आले होते. मोठे नाव असल्याने ओबीसीसह काही प्रमाणात दलित व मुस्लिम मतेही त्यांच्या पारड्यात गेली. मात्र, मलाही चार लाख १३ हजार मते मिळाली. पराभूत उमेदवारांत सर्वाधिक मते घेणारा मी उमेदवार ठरलो होतो. 

प्रचारात आम्ही दोघांनीही कधीवैयक्तीक आणि कौटुंबिक टिका - टिप्पण्णी केली नाही. दरम्यान, यानंतर काही दिवसांनीच अंबा सहकारी साखर कारखान्याची निवडणुक लागली. दहा वर्षांपासून हा  कारखाना त्यांच्या ताब्यात होता. निवडणुकीसाठी आम्ही आमच्या पद्धतीने तयारी केली होती.

पण, अचानक एक दिवस त्यांचा फोन आला. ‘रमेश निवडणुकीची तयारी काय  म्हणतेय? 
त्यावर मी उत्तर दिले, बघू काय होतय ते. 
त्यावर ते म्हणाले, तु लहान असताना लोकसभेला चांगली लढत दिलीस, अरे अख्खी राष्ट्रवादी माझ्यासोबत होती तरी चार  लाखांवर मते घेतलीस, अंबा कारखाना बिनविरोध काढ, संचालक मंडळात मी काही नावे सांगतो तेवढे लोक ऍडजस्ट कर. 

मला तर काही कळेनासे झाले. गोंधळून गेलो होतो, मी ठिक आहे साहेब म्हणालो. आणि कारखाना बिनविरोध आमच्या ताब्यात आला. 

त्यानंतर  काही दिवसांनीच केज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक लागली. त्यावेळीही त्यांचा असाच फोन आला. केज बाजार समिती बिनविरोध काढ, आमचे दोन लोक संचालक  मंडळात घे, मी दोघांना संधी दिली.

देशपातळीवर गाजलेल्या निवडणुकीत मी विरोधी  उमेदवार असताना दोन संस्था बिनविरोध काढून देण्याचं मोठेपण दुसऱ्या कोणाकडे असेल  असे वाटत नाही. पुढे आमच्यातही कधी कटुता आली नाही. मागच्या निवडणुकीत भलेही मी राष्ट्रवादीत होतो तरी त्यांनी प्रचाराच्या भाषणात माझे नावांचा चांगूलपणाने उल्लेख 
केला. 

शब्दांकन : दत्ता देशमुख 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख