Entered NCP to Win Raver Constituency | Sarkarnama

रावेर लोकसभा मतदारसंघ 'राष्ट्रवादी'ला निवडून देण्यासाठीच प्रवेश : संतोष चौधरी 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई येथे पक्ष कार्यालयात दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बैठकीस उपस्थित आहेत. यावेळी माजी आमदार संतोष चौधरी यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी पवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

जळगाव : भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठीच आपला प्रयत्न राहणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी 'सरकारनामाशी' बोलतांना व्यक्त केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबई येथे पक्ष कार्यालयात दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बैठकीस उपस्थित आहेत. यावेळी माजी आमदार संतोष चौधरी यांनी पक्षात प्रवेश केला. यावेळी पवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूणभाई गुजराथी, आमदार डॉ. सतीश पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक संजय पवार, अनील भाईदास पाटील आदी उपस्थित होते. 

संतोष चौधरी हे सन 1994 भुसावळ विधानसभा मतदारसंघातून 'राष्ट्रवादी'तर्फे निवडून आले होते. मात्र, हा मतदार संघ राखीव झाल्यामुळे पुढे त्यांना संधी मिळाली नाही. मात्र, त्यांचे स्वीय सहाय्यक संजय सावकारे यांना 'राष्ट्रवादी' तर्फे उमेदवारी देवून त्यांनी निवडून आणले होते. कालातरांने मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. परंतू, सन 2016 मध्ये भुसावळ पालीका निवडणुकीत त्यांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र'करीत 'जनाधार पक्ष' स्थापन केला होता. 

मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला. परंतु त्यांच्या पक्षाटे 19 नगरसेवक निवडून आले आहेत. आज त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. चौधरी यांचे भुसावळ व तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 

लोकसभेत यश मिळविणार : चौधरी
संतोष चौधरी यांच्याशी 'सरकारनामा'प्रतिनिधीने संपर्क साधला असता, ते म्हणाले, "मी मुंबईत पक्षाच्या कार्यालयात पक्षाचे नेते शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणूकीत रावेर लोकसभा मतदार संघातून पक्षाचा उमेदवार विजयी करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख