बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला घेरणार :खर्गे

 बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला घेरणार :खर्गे

मुंबई: भाजप-शिवसेना सरकारच्या पाच वर्षांच्या काळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून, सर्वच समाजघटकांमध्ये सरकारविरोधात तीव्र संताप आहे. दुष्काळ, पूर हाताळण्यात सरकारला आलेले अपयश, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, आर्थिक मंदी या मुद्द्यांवर कॉंग्रेस पक्ष सरकारला घेरणार आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. 

विधानसभा निवडणुकीसाठी टिळक भवन येथे उभारण्यात आलेल्या प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अद्ययावत वॉर रूमचे उद्‌घाटन खर्गे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. 

"आरे'मधील वृक्षतोडीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, सरकारने पोलिसी बळाचा वापर करून मध्यरात्री "आरे'मधील झाडांची कत्तल केली. याला विरोध करणाऱ्या मुंबईकरांना, तरुण विद्यार्थी आणि पर्यावरणवाद्यांना पोलिसांनी अटक करून जेलमध्ये डांबले आहे. 

डिस्कव्हरी चॅनलच्या मॅन वर्सेस वाईल्ड या कार्यक्रमामध्ये मोदीजींनी आपल्या काकांना लाकडाचा व्यवसाय करायचा होता, पण आजीने वृक्षामध्ये जीव असतो, लाकडाचा व्यवसाय करू नको, असे सांगितले होते. याची आठवण करून देत आपण पर्यावरणाबाबत किती संवेदनशील आहोत हे पंतप्रधानांनी त्यांच्या लाडक्‍या मुख्यमंत्र्यांना सांगावे आणि अटक केलेल्या तरुण आणि विद्यार्थ्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश द्यावेत, असे खर्गे म्हणाले. 

विधानसभेसाठी कॉंग्रेस सज्ज : थोरात 
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कॉंग्रेसची वॉर रूम सज्ज आहे. या वॉर रूमच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाची भूमिका मतदारापर्यंत पोचणे आणि प्रचाराचे समन्वय साधण्याचे काम केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आघाडीची पूर्ण तयारी झाली आहे. राज्यभरात स्टार प्रचारकांच्या सभा होणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com