Elections were rigged- alleges Mayawati | Sarkarnama

EVM मध्ये फेरफार; पुन्हा निवडणुका घ्या : मायावती

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 मार्च 2017

मला पक्षाकडून मिळालेल्या अहवालानुसार, मुस्लिम बहुल भागांमध्येही जास्तीत जास्त मते भाजपलाच मिळाल्याचे आढळून आले. ज्या भाजपने एकाही मुस्लिम उमेदवारास उमेदवारी दिली नाही; त्याच पक्षास इतकी मुस्लिम मते मिळाली तरी कशी? आम्हाला हे पटत नाही. मुस्लिम समुदायाने भाजपला मत दिलेच नाही, असे माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. तेव्हा हा सरळसरळ गैरप्रकार आहे.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील अवघ्या 18 जागांवर आघाडी मिळालेल्या बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज (शनिवार) या निकालावर अत्यंत प्रक्षुब्ध प्रतिक्रिया व्यक्त केली.

ज्या भारतीय जनता पक्षाने (भाजप) या निवडणुकीसाठी एकाही मुस्लिम उमेदवारास उमेदवारी दिली नाही; त्याच पक्षास मुस्लिम मते मिळतीलच कशी, अशी संतप्त विचारणा करत मायावती यांनी भाजपकडून मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम मशिन्स) फेरफार करण्यात येत असल्याचा आरोप केला. बसपाचा हा 1993 नंतरचा उत्तर प्रदेशमधील सर्वांत वाईट पराभव आहे. 1993 च्या निवडणुकीत पक्षास 67 जागा मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत पक्षास अवघ्या 18 जागांवर आघाडी मिळाली आहे. या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशात फेरनिवडणूक घेण्याची मागणी मायावती यांनी केली आहे.

मायावती म्हणाल्या -

    मतदान यंत्रांनी भारतीय जनता पक्षाशिवाय इतर पक्षांना दिले जाणारे मत स्वीकारलेच नाही, असे या निकालांमधून दिसून येत आहे.
    मला पक्षाकडून मिळालेल्या अहवालानुसार, मुस्लिम बहुल भागांमध्येही जास्तीत जास्त मते भाजपलाच मिळाल्याचे आढळून आले. ज्या भाजपने एकाही मुस्लिम उमेदवारास उमेदवारी दिली नाही; त्याच पक्षास ैइतकी मुस्लिम मते मिळाली तरी कशी? आम्हाला हे पटत नाही. मुस्लिम समुदायाने भाजपला मत दिलेच नाही, असे माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. तेव्हा हा सरळसरळ गैरप्रकार आहे.
    याआधी, 2014 मधील निववडणुकीमध्येही मतदान यंत्रांत फेरफार करण्यात आल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्याशिवाय भाजपला असे यश मिळणे शक्‍य नव्हते. त्याचवेळी, उत्तर प्रदेशातही मतदान यंत्रांवरील कोणतेही बटण दाबल्यास मत भाजपलाच जात असल्याची चर्चा होती. तसेच अशा स्वरुपाच्या तक्रारी महाराष्ट्रामध्ये नुकत्याच झालेल्या नगरपालिकांमधील निवडणुकांतही करण्यात आल्या आहेत.
    याआधी झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने मला मतदानयंत्रांमधील गैरप्रकाराविष्यी विचारणा केली होती. मात्र तेव्हा मी त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. परंतु त्याची ही भीती खरी ठरल्याचेच आता स्पष्ट झाले आहे. तेव्हा आता या प्रकाराविषयी मौन पाळणे भारतीय लोकशाहीच्या हिताचे ठरणार नाही. भाजपने लोकशाहीची हत्या केली आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख