नवी मुंबईच्या इच्छुकांना 'कोरोना' पेक्षा वाटतेय निवडणूक महत्त्वाची

नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने दिघा, ऐरोलीत मागील काही दिवसांपासून राजकीय पक्षांकडून हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
Navi Mumbai Commissioner Warns Political Aspirants
Navi Mumbai Commissioner Warns Political Aspirants

वाशी  : राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण अनेक ठिकाणी सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनोचा फैलाव होऊ नये याकरीता गर्दीचे कार्यक्रम बंद करण्याचे आदेश राज्य सरकार, पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मात्र या आदेशाला नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवारांकडून केराची टोपली दाखवली जात आहे.

निवडणुकीच्या तोंडावर आयोजित नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजपच्या वतीने कोणत्याही नियमाचे पालन न करता गर्दीत हळदी-कुंकवाचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. या कार्यक्रमाला नवी मुंबई महापालिकेचे स्थायी समिती सभापती नवीन गवते यांनीही हजेरी लावली होती. वाशी येथेही हळदी-कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पालिकेच्या इच्छुक उमेदवारांना राज्य सरकारच्या आदेशापेक्षा निवडणूक महत्त्वाची वाटत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने दिघा, ऐरोलीत मागील काही दिवसांपासून राजकीय पक्षांकडून हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. हळदी-कुंकूच्या कार्यक्रमांत गर्दी आणण्यासाठी अनेक सिनेकलाकार आणि आदेश बांदेकर हेही ऐरोलीत आले होते. एकीकडे नवी मुंबईत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य प्रशासन, पालिका प्रशासनाने राजकीय नेत्यांना गर्दीचे कार्यक्रम घेऊ नयेत, असे सांगितले होते. 

शुक्रवारी घणसोलीतील सेंट्रल पार्कचे उद्‌घाटन कोरोनामुळे महापौरांनी अत्यंत साध्या पद्धतीने, गर्दी टाळत केले होते. मात्र आपल्याच महापौरांचा आदर्श भाजपच्या नगरसेवक, नगरसेविकांनी न घेता सारे नियम धाब्यावर बसवत हळदी-कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला होता.

ऐरोलीतील सेनेचा कार्यक्रम रद्द

ऐरोली नाका येथे शिवसेनेचे अॅड. रेवेंद्र पाटील यांनी शनिवारी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र कोरोना व्हायरसमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा कार्यक्रम रद्द करून मास्क वाटप करणार असल्याचे अॅड. रेवेंद्र पाटील यांनी सांगितले.

राज्य सरकार, पालिका प्रशासनाने गर्दीचे कार्यक्रम टाळावेत, असे आदेश दिले आहेत. मात्र आदेश धुडकावून जर कार्यक्रम केले गेले तर कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. नागरिकांनी गर्दीचे कार्यक्रम टाळावेत, असे माझे आवाहन आहे - अण्णासाहेब मिसाळ, पालिका आयुक्त.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com