Election is the agitation for independent Vidarbha, says vidharbh rajya andolan samiti | Sarkarnama

स्वतंत्र विदर्भासाठी निवडणूक हेच आंदोलन; विदर्भ राज्य आंदोलन समितीची घोषणा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे आघाडी सरकारनंतर युती सरकारनेही दुर्लक्ष केले. आश्‍वासन देऊन विदर्भात यश मिळविणाऱ्या भाजपलाही त्याचा विसर पडला. त्यामुळे आता स्वतंत्र विदर्भासाठी ‘निवडणूक हेच आंदोलन’ असल्याचे जाहीर करून विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या नऊ संघटना आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याची घोषणा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी मंगळवारी अकोला येथे केली. 

अकोला : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीकडे आघाडी सरकारनंतर युती सरकारनेही दुर्लक्ष केले. आश्‍वासन देऊन विदर्भात यश मिळविणाऱ्या भाजपलाही त्याचा विसर पडला. त्यामुळे आता स्वतंत्र विदर्भासाठी ‘निवडणूक हेच आंदोलन’ असल्याचे जाहीर करून विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या नऊ संघटना आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढणार असल्याची घोषणा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी मंगळवारी अकोला येथे केली. 

अकोला येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. चटप यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी २ ते १२ जानेवारी २०१९ या काळात विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधून ‘विदर्भ राज्य निर्माण यात्रा’ काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 

विदर्भ राज्याच्या मागणीसाठी आवश्‍यक जनजागृतीकरिता ही यात्रा काढण्यात येत असल्याचे ॲड. चटप यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला रंजना मामर्डे, सुशे जोगडे, सतिष देशमुख, धनंजय मिश्रा, डॉ. मनिष खंडारे, ललित बहाडे, मनोज तायडे, डॉ. नीलेश पाटील आदींची उपस्थिती होती.

‘संसदेच्या अधिवेशनात निर्णय घ्या’

संसदेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात किंवा फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा निर्णय घेण्याची मागणी  अॅड. चटप यांनी केली.

भाजपकडून विदर्भातील जनतेचा अवमान

भाजपने निवडणूक काळात स्वतंत्र विदर्भ राज्याचे आश्‍वासन दिले. निवडून आल्यानंतर त्यांना या आश्‍वासनाचा इतर आश्‍वासनाप्रमाणेच विसर पडला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तर विदर्भ राज्य आमच्या अजेंड्यावरच नसल्याचे सांगून विदर्भातील जनतेचा अवमान केला असल्याचे अॅड. चटप म्हणाले.

या पक्ष व संघटनांचा सहभाग

  • विदर्भ राज्य आंदोलन समिती
  • विदर्भ राज्य आघाडी
  • विदर्भ माझा
  • नाग विदर्भ आंदोलन समिती
  • जामुंतराव धोटे विचार मंच
  • आम आदमी पार्टी
  • बहुजन रिपब्लिकन पार्टी
  • राष्ट्रीय जनसुराज्य पक्ष
  • प्रहार जनशक्ती पक्ष
  • खोब्रागडे रिपब्लिकन पक्ष (खोरिप)

पश्‍चिम विदर्भातील यात्रेचा प्रवास

२ जानेवारीला नागपूर येथून ११ वाजता यात्रेला सुरुवात. कोंढाळी, कारंजा, तिवसा मार्गे मोझरी येथे मुक्काम. ३ जानेवारीला अमरावती, भातकुली, दर्यापूरमार्गे मूर्तिजापूर येथे मुक्काम. ४ जानेवारीला अकोला, बाळापूर, खामगाव, नांदुरामार्गे मलकापूर येथे मुक्काम. ५ जानेवारीला मोताळा, बुलडाणा, चिखली, देऊळगाव मार्गे सिंदखेडराजा. ६ जानेवारीला लोणार, मेहकर, रिसोड, मालेगावमार्गे वाशीम येथे मुक्काम. ७ जानेवारीला मंगरुळपीर, कारंजा लाड, बार्शीटाकळी, अकोट. ८ जानेवारीला अंजनगाव, अचलपूर, चांदूरबाजार, मोर्शीमार्गे वरूड येथे मुक्काम. ९ जानेवारीला आष्टी, आर्वी, यवतमाळ, नेर, दारव्हा.  १० जानेवारीला दिग्रस, पुसद, महागाव, आर्णी, घाटंजी.  ११ जानेवारीला पांढरकवडा, मारेगाव, वणी, चंद्रपूर येथे मुक्काम. १२ जानेवारी भद्रावतीमार्गे नापगूर येथे दुपारी १ वाजता समारोप.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख