विधानसभा अध्यक्षांची निवडणूक ठरणार अत्यंत महत्वाची  

विरोधी पक्षाने सरकारच्या विरोधात अविश्‍वासाचा ठराव आणला तर अध्यक्ष हा ठराव कशा रीतीने मांडावा यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
vidhimandal
vidhimandal

मुंबई  : राजकीय घडामोडींच्या उलथापलथी सुरू असताना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सत्ताधारी आणि विरोधक यांची कसोटी लागणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारचे भवितव्य स्पष्ट होणार आहे.

राज्यात कोणत्याही पक्षाला स्वबळावर सत्ता स्थापन करण्याइतके संख्याबळ नसल्यामुळे सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता. त्यातच भाजप-शिवसेना हे पक्ष युतीने सरकार स्थापन करू शकले नाहीत. शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस या तीन पक्षांच्या वतीने सरकार स्थापन करण्याची शक्‍यता बळावली असताना "राष्ट्रवादी'चे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी अचानक बंड केले. 


विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन बोलावले जाईल. यासाठी तीन दिवसांचे अधिवेशन घेण्यात येईल. यानंतर विधिमंडळात सर्वांत ज्येष्ठ सदस्याला हंगामी अध्यक्ष म्हणून राज्यपाल शपथ देतात. त्यानंतर दोन दिवस सर्व आमदारांचा शपथविधी होईल. तो झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. या पदासाठी अर्ज दाखल केले जातील. अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल.

ती बिनविरोध निवड झाली तर सरकारचा मार्ग सुकर होईल. निवडणूक झाली आणि सत्ताधारी पक्षाचा पराभव झाला, तर विरोधी पक्षाचा अध्यक्ष होईल. यानंतर विरोधी पक्षाने सरकारच्या विरोधात अविश्‍वासाचा ठराव आणला तर अध्यक्ष हा ठराव कशा रीतीने मांडावा यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. मतदान कोणत्या पद्धतीने घ्यायचे, आवाजी, थेट प्रत्यक्ष सदस्याचे मत विचारात घेऊन करायचे, याचा निर्णय अध्यक्ष घेऊ शकतात. त्यामुळे अध्यक्षांची भूमिका फार महत्त्वाची राहणार आहे.  

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी शपथ घेतली आहे. आता विधानसभेत सत्ताधारी पक्षाला बहुमत सिद्ध करावे लागेल. त्यापूर्वी आमदारांचा शपथविधी होईल. त्यानंतर अध्यक्षपदाची निवड केली जाईल.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com