मुलीचा पराभव झाल्यानंतर साईदर्शनासाठी आलोय!

विजय झाल्यानंतर उमेदवार साईबाबांच्या दर्शनासाठी येतात. मी माझ्या मुलीचा पराभव झाल्यानंतर साईदर्शनासाठी आलो आहे. बाबांचा पूर्वीपासूनचा भक्त आहे. मी लवकरच माझे आत्मचरित्र लिहिणार आहे, असे खडसे यांनी या वेळी सांगितले.
मुलीचा पराभव झाल्यानंतर साईदर्शनासाठी आलोय!

शिर्डी (नगर) : "विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला. त्यामुळे महायुतीचे सरकार यावे, ही जनतेची इच्छा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी निवडणूक प्रचारात मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव नक्की केले आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन होईल,'' असा विश्‍वास भाजप नेते एकनाथ खडसे यांनी आज व्यक्त केला.

खडसे यांनी आज कुटुंबीयांसमवेत येथे येऊन साईदर्शन घेतले. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे व साईसंस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी त्यांचे स्वागत केले.

तथापि, युती करताना नेमके काय ठरले, हे मला माहीत नाही. ज्यांनी ठरविले, ज्यांच्यासमोर ठरले, त्यांनाच ते माहीत आहे. मी त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही, असेही खडसे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हवे आहे. खासदार संजय राऊत यांच्यासारखे नेते आक्रमक झाले आहेत. भाजप बॅकफुटवर गेला आहे. याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, "शिवसेना मुख्यमंत्रिपदावर हक्क सांगत नाही. ते म्हणतात, ठरल्याप्रमाणे करावे. आता नेमके काय ठरले हे मला माहीत नाही. दोघेही ते सांगत नाहीत. अशा वेळी 'वेट अँड वॉच' एवढेच आपल्या हातात आहे. तथापि, भाजप बॅकफुटवर गेलेला नाही. भाजपचा स्वभाव वेगळा आहे. युती तुटू नये, तणाव निर्माण होऊ नये, यासाठी भाजपने संयमित भूमिका घेतली आहे.''

राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत का? खासदार संजय राऊत व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात बोलणी झाली. याबाबत आपणास काय वाटते, या प्रश्‍नाला उत्तर देताना खडसे म्हणाले, "जर-तरला काही अर्थ नसतो. त्यावर बोलणेदेखील योग्य नाही. मला वाटते, तसे काही होणार नाही. कारण जनतेने कौल महायुतीला दिला आहे.''

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महायुतीचे सरकार स्थापन होण्यासाठी पुढाकार घेत आहे का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, "संघ असा पुढाकार किंवा आदेश कधीही देत नाही. मात्र, मार्गदर्शन व सल्ला देण्याचा अधिकार संघाला जरूर आहे.

 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com