Eknath Khadse says don't ask me about ministerial berth | Sarkarnama

 नाथाभाऊ पुन्हा मंत्री का झाले नाही ? हा प्रश्‍न सोडून काहीही विचारा    : खडसे 

शिरीष सरोदे
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युती तोडण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला होता आणि तो शिवसेनेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मला दिली होती, ती जबाबदारी मी पार पाडली.

- खडसे

भुसावळ(जि.जळगाव)   : " गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युती तोडण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला होता आणि तो शिवसेनेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी मला दिली होती, ती जबाबदारी मी पार पाडली,"  असा गौप्यस्फोट माजी महसूलमंत्री व भाजपचे नेते एकनाथराव खडसे यांनी येथे केला . 

भुसावळ येथे लोणारी मंगल कार्यालयात आज झालेल्या बुथप्रमुख व शक्ती केंद्रप्रमुखांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. 

खडसे म्हणाले," तुमचे सरकार येणार का? असे विचारले तर कॉंग्रेसवाले नाही म्हणतात. भाजपला समर्थ पर्याय निर्माण होणे अत्यंत अवघड आहे आणि त्यामुळेच सध्या भाजपला अपराध्याच्या चौकटीत उभे करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु आहे.2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचेच सरकार पुन्हा सत्तेत येईल ही काळ्या दगडावरची रेष आहे ."

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या दीडशे जागा निवडून येतील असे ठामपणे सांगत श्री . खडसे पुढे म्हणाले ,"  विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र येत आहे. भाजप आणि शिवसेनेची युती होईल की नाही यावर चर्चा सुरु आहे. युती होईल असे वरिष्ठ पातळीवर म्हणणे आहे आणि युती तुटली तरी दीडशे जागा निवडुन येतील असा मला  विश्‍वास आहे ."

सध्या पक्षात चांगली माणसे येत आहेत असे कोणाचेही नाव घेता खडसेंनी  सांगितले आणि नाथाभाऊ पुन्हा मंत्री का झाले नाही ?  हा प्रश्‍न सोडून काहीही विचारा असे कार्यकर्त्यांना शेवटी आवाहन केले.   

 कर्जमाफीमध्ये घोटाळा आहे असे शिवसेनेला वाटते तर तसा विरोध त्यांनी कॅबिनेट मंत्रीमंडळाच्या बैठकीत करणे गरजेचे आहे. कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी देतात आणि बाहेर जनतेसमोर वेगळे सांगतात हे योग्य नाही. असे मत श्री .  एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले. 

व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, सभापती प्रीती पाटील, युवराज लोणारी, पुरुषोत्तम नारखेडे, मुन्ना तेली आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख