निमंत्रण अनेक पक्षांचे पण मी कोणताही निर्णय घेतला नाही : खडसे

उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी 30-40 कोटी रुपयाची तरतूद करावी आणि स्मारक पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी मी केली. श्री. ठाकरे यांनी या स्मारकासाठी प्राधान्याने निधी देण्याचे मान्य केले . -एकनाथ खडसे
eknath khadse
eknath khadse

मुंबई :  कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षाच्या अनेक नेत्यांशी माझे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांना माझ्यासारखा 40-42 वर्षांचा राजकीय अनुभव असलेला कार्यकर्ता आपल्या पक्षात यावा असे वाटते. पण याबाबत मी कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांशी दोन दिवसांत झालेल्या भेटीगाठींमुळे एकनाथ खडसे चर्चेत आले आहेत. या संदर्भात विचारणा केली असता श्री. खडसे म्हणाले, श्री. शरद पवार यांची मी दिल्लीमध्ये भेट घेतली. माझ्या मतदारसंघातील दोन सिंचन प्रकल्पांना केंद्र सरकारची मान्यता मिळावी आणि सुमारे साडे सहा हजार कोटी रुपये निधी मिळावा यासाठी आपण मदत करावी अशी विनंती मी शरद पवार यांना केली. श्री. पवार यांनी या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन मला दिले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भेटीविषयी बोलताना श्री. खडसे म्हणाले, श्री. पवार यांचेशी ज्या प्रकल्पाबाबत मी बोललो होतो त्याच प्रकल्पाबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी मी चर्चा केली. तेही सकारात्मक होते. यावेळी मी त्यांना आणखी एक मागणी केली. कै. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी मी मंत्री असताना औरंगाबाद येथे पशुसंवर्धन खात्याची जागा दिलेली होती. पण त्याबाबत पुढे काही झाले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी 30-40 कोटी रुपयाची तरतूद करावी आणि स्मारक पूर्णत्वास न्यावे, अशी मागणी मी केली. श्री. ठाकरे यांनी या स्मारकासाठी प्राधान्याने निधी देण्याचे मान्य केले त्याचप्रमाणे त्या जागेलाही भेट देण्याचे मान्य केले.

मी नाराज नाही. माझी मनधरणी सुरू असल्याच्या बातमीत तथ्य नाही, असे सांगून श्री. खडसे पुढे म्हणाले, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे हे माझे अनेक वर्षांपासूनचे सहकारी आहेत. आमच्या भेटीत आपले सरकार का आले नाही ? याबाबत आमची चर्चा झाली. बाकी फारसे काही नाही.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com