chavan-shinde
chavan-shinde

मेट्रोच्यावेळी कलगीतुरा करणारे शिंद - चव्हाण गप्पात रंगले आणि नागरिक चक्रावले !

कल्याण  :   काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील मेट्रो प्रकल्पावरून खासदार शिंदे व राज्यमंत्री चव्हाण यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला होता.  पण  कल्याण येथे सिटी पार्क प्रकल्पाच्या  भूमिपूजन सोहळ्यात सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची दिलजमाई झाली असल्याचे दिसून आले. शिवसेना भाजप नेत्यांचे  सोयीनुसार ब्रेक अप आणि पॅच अप पाहून नागरिक मात्र चक्रावले !

कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी व्यासपीठावर  राज्यमंत्री  रवींद्र चव्हाण,जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे  यांच्यामध्ये गप्पा रंगल्या होत्या. त्यामुळे उपस्थित नागरिकांचे लक्षही भाजपामध्ये दादा म्हणून संबोधले जाणारे रवींद्र चव्हाण आणि  भाई या नावाने  सर्वश्रुत असलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे  वेधले गेले. 

अशी भांडणे 

 गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली शहरात विविध विकास कामांच्या भूमीपूजन  सोहळ्याचा सपाटा सूरु झाला आहे. कल्याणात पंतप्रधान  नरेंद्र मोदी  यांच्या हस्ते मेट्रो 5 व इतर कामांचे भूमीपूजन संपन्न झाले. यामुळे डिवचल्या गेलेल्या सेनेनेही भूमीपूजन  सोहळ्याची मालिका सुरू केली. 

त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत युतीत नांदत असलेल्या या दोन्ही पक्षांमध्ये  भूमीपूजन सोहळ्यांवरून जणू स्पर्धाच रंगली की काय असा सवाल निर्माण झाला होता. मात्र, कल्याण येथे सिटी पार्क प्रकल्पाच्या  भूमिपूजन सोहळ्यात सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची दिलजमाई झाली असल्याचे दिसून आले.  सोयीनुसार ब्रेक अप आणि पॅच करण्याची  भूमिका  दोन्ही पक्ष अवलंब असल्याने सर्वसामान्य  नागरीकही चक्रावून गेले आहेत.

कल्याण येथील फडके मैदानात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते संपन्न झालेल्या  विविध विकासकामांच्या भूमीपूजन सोहळ्यात  पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नव्हते .  तसेच केडीएमसी  महापौर  विनिता राणे यांना मुख्य व्यासपीठावर स्थान न दिल्याने सेनेच्या गोटात संतापाचे वातावरण होते. या सोहळ्यावर सेनेने बहिष्कार घातला होता. 

त्यांनतर नवीन होऊ घातलेला पत्रिपुल, कल्याण - शीळ रस्ता रुंदीकरणाचा भूमीपूजन सोहळा  पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रभागातील इतर विकासकामांचे भूमीपूजनही  खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर या दोन्ही पक्षात भूमीपूजन सोहळ्यावरून चाललेली स्पर्धा  नागरिकांच्या मनोरंजनाचा विषय झाला आहे. 

आणि अशी दिलजमाई !

  कल्याण येथील गौरीपाडा परीसरात सिटी पार्क प्रकल्पाचे भूमीपूजन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते   मंगळवारी संपन्न झाले. विशेष म्हणजे  या सोहळ्यात एकाच व्यासपीठावर सेना आणि भाजपचे वरीष्ठ पदाधिकारी  मांडीला मांडी लावून बसले होते. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गौरीपाडा परिसरात सेना आणि भाजप ने जोरदार बॅनरबाजी  केली होती.

 गेल्या काही दिवसात या दोन्ही पक्षातील बॅनरवाद हा चर्चेचा विषय झाला होता. मात्र या भूमीपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर बहुतांश ठिकाणी  एकाच बॅनरवर सेना आणि भाजपच्या पदाधिका-यांचे फोटो एकत्रित लावण्यात आले होते. 

त्यामुळे  आधी भांडायचे व नंतर एकत्र यायचे असा राजकीय फ़ंडा वापरत आगामी निवडणुकांमध्येही  हे पक्ष  पुन्हा नागरिकांना उल्लू बनवतात का? ते पाहावे लागेल.  मेट्रो प्रकल्पाच्या श्रेयवादावरून भांडणारे हे दोन्ही पक्ष हिंदुत्ववादाचे स्टेशन  गाठण्यासाठी एकाच मेट्रोत सवार झाले तर नवल नाही.   

सोयीनुसार ब्रेक अप आणि पॅच अप

---------------------------------

- उल्हासनगर निवडणूकीत वेगळी चूल 
- केडीएमसी निवडणूकी आधी काडीमोड , निवडणूकीनंतर एकत्र येत सत्तास्थापना 
- माणकोली उड्डाणपूलाचे दोन्ही पक्षांकडून  भूमीपूजन 
- गत महापौर पदाचे दावेदार भाजप असतानाही सेनेचा महापौर विराजमान 
-  कल्याणातील फडके मैदानातील भूमीपूजन सोहळ्याला सेनेची पाठ 
- सिटी पार्क च्या भूमीपूजन सोहळ्याला दोन्ही पक्षात दिलजमाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com