नवी मुंबईमध्ये लागणार एकनाथ शिंदेंची कसोटी

नवी मुंबईमध्ये लागणार  एकनाथ शिंदेंची कसोटी

मुंबई : नवी मुंबई महापालिकेमध्ये कार्यरत असणाऱ्या शिवसेना नगरसेवक गटतटामध्ये विखुरल्याची गोष्ट लपून राहीलेली नाही. चार दिवसापूर्वीच महापालिकेतील स्थायी समिती सदस्य निवडीवरून शिवसेना नगरसेवकांची नाराजी उफाळून आली. 20 नगरसेवकांनी संपर्कप्रमुखांकडे राजीनामे दिल्यामुळे नवी मुंबईतील संघटनात्मक गडाला पालिका सभागृहात नजीकच्या भविष्यात पडणारे खिंडार बुजविण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. 

शिवसेना नवी मुंबई महापालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक जिल्हाप्रमुख पद रिकामे असतानाही खासदार राजन विचारे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली लढली. कधी नव्हे तर बऱ्याच वर्षानी 38 नगरसेवक शिवसेनेचे निवडून आल्याने सभागृहात भगवामय वातावरण दिसून आले. अर्थात 38 नगरसेवकांमध्ये शिवसेनेच्या मूळ नगरसेवकांचे प्रमाण कमी व कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आलेल्या घटकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आयारम-गयारामांमुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद न वाढता पक्षसंघटनेला सूज आली. शिवसेना नगरसेवकांमध्ये सुरूवातीपासून विजय नाहटा गट आणि विजय चौगुले गट पहावयास मिळत असून नेरूळ, कोपरखैराणे व ऐरोली परिसरातील काही मातब्बर नगरसेवक कोणाच्या गटात न जाता स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहेत. 

शिवसेनेच्या संघटनात्मक कार्यक्रमात उपनेते विजय नाहटा आणि विरोधी पक्ष नेते विजय चौगुले एकत्र दिसत असले तरी त्यांच्यातील दूरी पहावयास मिळते. पालिका निवडणूकीला दोन वर्षाचा कालावधी उलटला तरी नवी मुंबईच्या शिवसेना नगरसेवकांमध्ये मनोमिलाफ घडवून आणण्यास व गटबाजी संपुष्ठात आणण्यास पालकमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाला मर्यादा पडल्या आहे. शिंदे नवी मुंबईकडे लक्ष देण्याऐवजी ठाण्यातच जास्त रमत असल्याची नाराजी निष्ठावंत जुन्या शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

राज्यात भाजपा-सेनेचे सरकार आल्यावर शिंदेंचा नवी मुंबई शिवसेनेकडून नागरी सत्कार करण्यात आल्यावर शिंदेंनी आपण आठवड्यातून एक दिवस नवी मुंबईला वेळ देणार असल्याचे जाहिर केले होते. तथापि संघटनेच्या शिवसैनिकांना दिलेले पालकमंत्र्यांनी आश्‍वासन कधीही पाळले नाही. शिंदेंचे नवी मुंबईत जनता दरबार तसेच जनतेशी सुसंवाद होत नसल्याची नाराजीही शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मागील पालकमंत्री गणेश नाईक हे सातत्याने वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात जनता दरबार भरवित असल्याने जनतेसोबत कार्यकर्त्यांचीही प्रशासन दरबारी रखडलेली कामे होत होती. जनतेची कामेही कार्यकर्ते घेवून येत असल्याने व ती कामे होत असल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या स्थानिक विभागात मान-सन्मान मिळत होता. पण पालकमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरूवातीच्या काळात एक जनसुसंवाद आयोजित केल्यावर पुन्हा कधीही या कार्यक्रमाचे आयोजन केले नाही. नवी मुंबईतील शिवसैनिकांमध्ये पालकमंत्र्यांविषयी नाराजी वाढीस लागली असून नवी मुंबईतील शिवसेना नगरसेवकांवर कोणाचाही अकुंश राहीलेला नाही. त्यामुळे आगामी काळात नवी मुंबईतील शिवसेनेतील गटबाजी मिटविताना व येथील संघटनेवर जरब निर्माण करताना पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com