ईडीने फास आवळला ;काँग्रेसच्या डी. के. शिवकुमारना केली अटक

कर्नाटक काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ते ओळखले जातात .
d_k_shivkumar
d_k_shivkumar

नवी दिल्ली  : बेकायदेशीर मालमत्ताप्रकरणी कर्नाटक कॉंग्रेसचे संकटमोचक व माजी मंत्री डी. के. शिवकुमार यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी  सायंकाळी  अटक केली. कर्नाटकात नऊ कुमारस्वामी यांचे सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना शोधत शिवकुमार दोन महिन्यांपूर्वी  मुंबईत दाखल झाले होते. त्यामुळे ते महाराष्ट्रातही प्रसिद्ध आहेत. कर्नाटक काँग्रेसचे संकटमोचक म्हणून ते ओळखले जातात . 

दिल्लीतील शिवकुमार यांच्या मालकीच्या फ्लॅटवर घालण्यात आलेल्या छाप्यात 8.59 कोटी रुपये सापडले होते. ही मिळकत अनधिकृत असल्याचा आरोप करुन शिवकुमार यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) शुक्रवारपासून चौकशी करण्यात येत होती. मंगळवारीही (ता. 3) दिवसभर त्यांची चौकशी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी शिवकुमार यांना आज दुपारी भोजनासाठीही बाहेर सोडले नाही. कार्यालयातच त्यांच्या भोजनाची सोय करण्यात आली होती.  

 सलग चार दिवस चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. अटकेनंतर त्यांना दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयात आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले. त्यांना बुधवारी (ता. 4) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, शिवकुमार जामीनासाठी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात अर्ज करणार आहेत.

शिवकुमार यांची अटक राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. तर शिवकुमार यांच्या अटकेची माहिती मिळताच त्यांच्या समर्थकांनी ईडी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. परिस्थिती आटोक्‍याबाहेर जात असल्याचे पाहून ईडी कार्यालयाला कुलूप लावण्यात आले. 

शिवकुमार यांच्या वडिलांच्या घरी सोमवारी धार्मिक कार्य होते. त्यात भाग घेण्याची परवानगी त्यांनी मागितली होती. पण, ही विनंती अधिकाऱ्यांनी फेटाळून त्यांच्याकडे सोमवारीही कसून चौकशी करण्यात आली. शिवकुमार ईडीच्या चौकशीला तोंड देण्यासाठी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेत होते. प्राप्तीकर लवाद मंडळाचे सेवानिवृत्त उपाध्यक्ष आर. पी. तोलानी यांच्यासमवेत त्यांनी बराच वेळ चर्चा केली होती. 

मंगळवारीही त्यांनी श्री. तोलानी यांच्याशी एका तासापेक्षा जास्त वेळ चर्चा करुन सल्ला घेतला होता. पण, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांना ईडीचे अधिकारी मंगळवारी ताब्यात घेतील अशी अपेक्षा होती. त्यानुसार त्यांना रात्री अटक करण्यात आली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com